रेल्वे दुपदरीकरणाचा मार्ग बोगद्यातून नेणार ः मुख्यमंत्री

0
217

>> कोळसा हाताळणी क्षमता वाढवणार नाही

रेल्वे दुपदरीकरणासाठी झाडे कापण्यात येणार नसून हा मार्ग बोगद्यातून नेण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पणजी येथे सांगितले. मोले येथील जंगल कापण्यास लोकांकडून वाढता विरोध होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल त्यासंबंधी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वे दुपदरीकरणसाठी ३०० किमीचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. आता कुळे ते केसरलॉक या दरम्यानचे ६० किमी लांबीचे काम शिल्लक राहिले आहे. हा रस्ता बोगद्यातून नेण्यात येणार आहे. मोलेच्या जंगलातून कुणीही नांगर फिरवणार नसून आपण लोकांना तसे आश्‍वासन देत असल्याचे ते म्हणाले.

मोले येथील अभयारण्यातून राष्ट्रीय महामार्ग नेण्याची या घडीला तरी सरकारची कोणतीही योजना नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आम्ही पुढील २५ वर्षांसाठीच्या साधनसुविधांची योजना आखत आहोत. मात्र त्याचा अर्थ असा नव्हे की, आम्ही आत्ताच रस्ता बांधणार आहोत असेही ते पुढे म्हणाले.

मुरगाव बंदरावरील कोळसा हाताळणीची क्षमता वाढवण्यात येणार नसून ती सध्या १५ दशलक्ष टनावरच ठेवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारने यापूर्वीच मोले येथील जंगलातील हजारो झाडे सरकारी प्रकल्प उभारण्यासाठी कापून टाकली आहेत. त्यामुळे देशभरातून सरकारवर टीकेचा भडिमार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल मोले येथे होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, वीज वाहिन्या व रेल्वे दुपदरीकरण या तीन प्रसल्पांसंबंधी वरील स्पष्टीकरण केले आहे.