रेल्वेस्फोट घडवलेले दहशतवादी लखनौत

0
70

>> पोलीस – दहशतवाद्यांमध्ये चकमक

 

येथील ठाकूरगंज भागातील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने त्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली असून रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूने चकमक सुरू होती. काल भोपाळ – उज्जैन प्रवासी रेल्वेत झालेल्या स्फोट लपलेल्या दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा संशय आहे. दरम्यान, एका संशयिताला कानपूर येथून अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी दिली.
घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे असल्याचा कयास असून दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता एटीएस पथकाने व्यक्त केली आहे. रेल्वे घातपातातील संशयित सैफुल्ला व त्याचे साथीदार लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसच्या पथकाने घराला घेरून सैफुल्लाला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने शरणागती न पत्करता एटीएस पथकातील जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे जादा कुमक बोलावून संपूर्ण परिसराला घेरण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत लपलेल्या दहशतवाद्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते.
सैफुल्ला याच्याबरोबर आणखीही संशयित दहशतवादी असण्याची शक्यता आहे. तीन दहशतवादी घरात लपल्याची शक्यता असून तिघेही मध्य प्रदेशमधील असल्याचे सांगितले जाते. ते तिघेही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी काम करत असल्याचा संशय आहे.