रेलमार्ग दुपदरीकरणावरुन विधानसभेत गदारोळ

0
54

>> कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब

राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण पश्‍चिम रेल्वेच्या रेलमार्ग दुपदरीकरणाच्या विषयावर विरोधकांनी अर्धातास चर्चेची मागणी करून सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात एकत्र आल्याने निर्माण झालेल्या गदारोळामुळे सभापती राजेश पाटणेकर यांना सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

विधानसभेत प्रश्‍नोत्तरांच्या तासाला कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी दक्षिण पश्‍चिम रेल्वेच्या रेलमार्ग दुपदरीकरणासंबंधी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्यावर प्रश्‍नाचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. मंत्री मोन्सेरात यांनी आपल्या परीने प्रश्‍नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. महसूल खात्याने रेलमार्ग दुपदरीकरण जमिनीच्या सर्वेक्षणात सहभाग घेतला. तथापि, रेलमार्गाच्या जागेची आखणी करण्यात आली नाही, असे मंत्री मोन्सेरात यांनी उत्तरात सांगितले.

आमदार साल्ढाणा यांनी मंत्री मोन्सेरात यांना अनेक उपप्रश्‍न विचारले. सभापतींनी प्रश्‍न विचारले जात असताना प्रश्‍नोत्तराचा तास संपल्याची घोषणा केली. तथापि, आमदार साल्ढाणा यांनी प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी वेळ वाढविण्याची मागणी सभापतींकडे केली. यावेळी भाजपच्या आमदार साल्ढाणा यांच्या मदतीला विरोधी पक्षाचे आमदार धावून आले. रेलेमार्ग दुपदरिकरणाच्या विषयावर सभागृहात अर्धातास चर्चेची मागणी केली. सभापती पाटणेकर यांनी चर्चेची मागणी मान्य करण्यास नकार दिल्याने विरोधी गटातील आमदार आलेक्स रेजिनाल्ड, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार प्रतापसिंह राणे, आमदार रवी नाईक, आमदार प्रसाद गावकर, आमदार चर्चिल आलेमाव, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर हे सभापती पाटणेकर यांच्या समोरील हौद्यात जमा झाले. सभापतींनी सर्व आमदारांना आपापल्या जागेवर परत जाण्याची सूचना केली. तथापि, विरोधी आमदारांनी अर्धातास चर्चेची मागणी लावून धरल्याने अखेर सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.