‘रेमल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली

0
4

>> पश्चिम बंगाल, ओडिसात हाय अलर्ट

>> एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात

बंगालच्या उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून रविवारी मध्यरात्री ते पश्चिम बंगालसह बांगलादेशला तडाखा देण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी 110 ते 120 किमी वेगाने वारे वाहतील, वाऱ्यांचा वेग ताशी 135 किमीपर्यंतही जाऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वादळाच्या परिणामी पश्चिम बंगालच्या किनारी भागात अनेक ठिकाणी रविवार सकाळपासूनच वारे आणि पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीला फटका बसला.

काही रेल्वे रद्द
पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आणि उत्तर 24 परगणा आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक घेतली.

पश्चिम बंगाल, ओडिसामध्ये मुसळधार पावसाचा इशारा

रेमल वादळामुळे पूर्व मेदिनीपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान खात्याने रविवारी मध्यरात्री सागर द्वीप आणि खेपुपारा दरम्यान पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीला 110 ते 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिसाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विमानतळ बंद

वादळामुळे हवामानात झालेला बदल पाहता कोलकातामधील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ रविवारी दुपारी 12 ते सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 394 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

मच्छीमारांना इशारा

मच्छिमारांना 27 मे च्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. दक्षिण आणि उत्तर 24 परगणा सारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 26-27 मे साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ रामलचा संभाव्य परिणाम लक्षात घेता कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने रविवारी दुपारपासून 21 तासांसाठी फ्लाइट ऑपरेशन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.