रेजिनाल्डचाही रामराम

0
13

ज्यांचे पक्षांतर रोखण्यासाठी कॉंग्रेसने घाईघाईने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती, ते कुडतरीचे आमदार आणि घोषित उमेदवार, तसेच पक्षाच्या निवडणूक समितीचे नेते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल आपल्या पक्षनेत्यांना गुंगारा देत आमदारकीचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी रेजिनाल्ड पक्षत्याग करण्याच्या तयारीत होते. ते आपल्या वाढदिवशीच आम आदमी पक्षाच्या वाटेवर असल्याची चाहुल लागताच कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्या घरी धाव घेत त्यांना पक्ष सोडून न जाण्याची विनवणी केली होती. राहुल गांधी यांनी स्वतः विनंती केल्याने तो बेत त्यांनी तेव्हा स्थगित केला खरा, परंतु येत्या निवडणुकीत कॉंग्रेससोबत राहण्यात स्वारस्य नसल्याने रेजिनाल्ड यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली असतानाही पक्षाला रामराम ठोकल्याने कॉंग्रेस नेते हात चोळत उरले आहेत.
विश्वजित राणेंनी विधिमंडळ पक्षाला प्रथम पाडलेले खिंडार आतापर्यंत भगदाडापलीकडे जाऊन पोहोचले आहे. निवडणुकीच्या तोंडावर लुईझिन फालेरो तृणमूलवासी झाले. रवी नाईकांनी भाजपाची वाट चोखाळली, परंतु ते दोन्ही नेते आपल्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाकडे चाललेले आहेत. रेजिनाल्डचे तसे नाही. अभ्यासू वृत्ती, विधानसभेत आपल्या विशिष्ट शैलीत परंतु प्रभावीपणे प्रश्न मांडण्याची आणि सरकारला घेरण्याची हातोटी आणि मतदारसंघातील लोकप्रियता या बळावर त्यांनी स्वतःविषयी मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या. मध्यंतरी ते आणि देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये दिसले तेव्हा रेजिनाल्डही भाजपच्या वाटेवर असल्याच्या वार्ता पसरल्या, तेव्हा ‘आपण भाजपमध्ये जाणार नाही हे हवे तर रक्ताने लिहून देतो’ असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले होते. परंतु भाजपात जाणार नाही याचा अर्थ कॉंग्रेस सोडणार नाही असा नव्हे, असे हे ‘नरो वा कुंजरोवा’ धर्तीचे चलाख उत्तर होते. रेजिनाल्ड आता तृणमूल कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत असे दिसते, कारण सालसेतमधले भाजप आमदार पक्षाच्या तिकिटावर लढण्याऐवजी अपक्ष म्हणून मतदारांना सामोरे जाऊ पाहात असताना भाजपात जाणे हा त्यांच्यासाठी आत्मघात ठरेल!
रेजिनाल्डसारखा अजून पुरेशी राजकीय कारकीर्द न घडलेला नेताही जर कॉंग्रेसचा त्याग करून चालला असेल तर पक्षामध्ये कुठे तरी काही तरी खूप चुकते आहे हे निश्‍चित. एखाद्या पक्षाने नुसते बोलावणे पाठवले म्हणून काही कोणी पक्ष सोडून जात नसतो. त्यामागे काही कारणे असतात. असंतोष असतो. पक्षनेतृत्वाप्रतीचा अविश्वास असतो. रेजिनाल्ड यांची नाराजी दोन वर्षांपासूनची आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणणारे अनेक मुद्दे समोर आहेत. दिवसेंदिवस नवनवे विषय ऐरणीवर येत आहेत. इतके असूनही जर कॉंग्रेसला स्वतःला एक पर्याय म्हणून उभे करता येत नसेल तर त्याला सर्वस्वी पक्षनेतृत्व आणि त्याची निर्णयांबाबतची धरसोड वृत्तीच कारणीभूत आहे. त्यामुळे काल रेजिनाल्ड यांच्या राजीनाम्यानंतर दिनेश गुंडुराव यांनी कितीही थयथयाट केलेला असो, ही जी गळती लागली आहे त्याला पक्षाची राज्य स्तरावरील अनागोंदी आणि राष्ट्रीय स्तरावरील निर्नायकी स्थितीच सर्वाधिक जबाबदार आहे. सतरा आमदार निवडून आलेल्या कॉंग्रेस पक्षामध्ये आता केवळ दिगंबर कामत आणि प्रतापसिंह राणे हे दोघेच आमदार उरले आहेत. दिगंबर कामत हेही भाजपात चालल्याच्या वार्ता मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या, परंतु काल कामत यांनी त्याचा इन्कार केला आहे. आपण कॉंग्रेसचे नेतृत्व करून त्याला विजयापर्यंत नेण्यास कटिबद्ध आहोत असे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक दिगंबर यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पक्षाने घोषित केलेले नाही. तसे वातावरण त्यांचे चेले व गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनीच निर्माण केलेले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत पक्षात राहणे दिगंबर यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदापर्यंत घेऊन जाणारे ठरू शकते याची त्यांना पूर्ण जाणीव आहे, जे भाजपा त्यांना देऊ शकणार नाही. राणे यांची विधानसभेतील पन्नास वर्षांची कारकीर्द झाली आहे. हे त्यांचे निवृत्तीचे वय आहे. त्यामुळे सध्याच्या राजकारणात दुय्यम स्थानासाठी त्यांनी राजकारणात सक्रिय न राहणेच त्यांच्यासाठी खरे सन्मानाचे ठरेल. योग्य निर्णय घेण्यास ते समर्थ आहेतच.
आजवरच्या या सर्व पडझडीनंतर कॉंग्रेसला बहुतांशी नव्या चेहर्‍यांसह निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे हे आता पुरेपूर स्पष्ट झाले आहे. हा जुनाजाणता पक्ष आता राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उभारी घेणार की येणार्‍या निवडणुकीच्या धुमश्चक्रीत मातीत मिसळून जाणार हे पक्षाच्या धुरिणांनी ठरवायचे आहे. ‘कॉंग्रेसमुक्त भारता’च्या मोदींच्या स्वप्नाची सुरुवात गोव्यातून तर होणार नाही ना?