तिघा पादचाऱ्यांना भरधाव रेंट-अ-कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली, तर अन्य दोघे जण जखमी झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास उपासनगर-सांकवाळ महामार्गावर घडला. जखमींना मडगावच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृत महिलेचे नाव गुलताजबी पटेल असे आहे.
सविस्तर माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास जीए-07-टी-0156 क्रमांकाच्या रेंट-अ-कारने तिघा पादचाऱ्यांना धडक दिली. ही कार वास्कोहून वेर्णाच्या दिशेने जात होती. भरधाव निघालेल्या कारने धडक दिल्याने गुलताजबी पटेल, तहसीलदार साहिल, महम्मद यासिन ताम्बाडी हे तिघेही पादचारी दूरवर फेकले गेले. हे सर्व पादचारी कासांवली भागात राहणारे आहेत. पटेल या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे दिसताच तिला गोमेकॉमध्ये दाखल केले; मात्र तेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी असून, त्यांना मडगावच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. वेर्णा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून, या प्रकरणी पोलिसांनी अफताब फराशी या कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी मुख्याध्यापिकेला अटक
शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस कर्मचारी सागर नाईक याला अटक केल्यानंतर त्याने चौकशीत आपल्या मामीचे नाव घेतले. यानंतर सागर नाईक याची मामी अर्थात सुनिता पाऊसकर (रा. माशेल) हिला सोमवारी फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. सुनीता पाऊसकर ही एका हायस्कूलची मुख्याध्यापिका आहे. तिच्या चौकशीत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपाश्री सावंत उर्फ गावस (रा. माशेल) असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी काल तिचा शोध घेतला असता ती सापडू शकली नसल्याने फोंडा पोलिसांनी तिच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने उसगावातील एका महिलेची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस कर्मचारी सागर नाईक याला रविवारी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याची मामी सुनीता पाऊसकर हिचे नाव समोर आले. त्यानंतर फोंडा पोलिसांनी तिला अटक केली. अटक केलेल्या संशयित सुनीता पाऊसकर हिची अधिक चौकशी केली असता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपाश्री सावंत गावस असल्याचे स्पष्ट झाले. ती सापडू शकली नसल्याने फोंडा पोलिसांनी तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.