अजूनही ढीगार्याखाली सुमारे ५० मजूर असल्याची शक्यता असून मात्र नेमके किती कामगार तेथे होते ते समजू शकलेले नाही, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी वेनान्सीओ फुर्तादो यांनी दिली. इमारत कोसळून दोन दिवस पूर्ण झाल्यामुळे इमारतीखाली गाडलेले मजूर वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले आहे. दरम्यान, बांधकाम प्रकल्पाची चौकशी सुरू झाली असून गुन्हा दाखल केलेले सर्वजण बेपत्ता आहेत.
दरम्यान, काणकोणच्या आणखीन चार व्यक्ती बेपत्ता आहेत. दुर्घटनेला जबाबदार असलेले मालक, ठेकेदार, अभियंता आणि पर्यवेक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र ते फरार आहेत. त्यांच्या घरी पोलीस पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली. दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून रु. २ लाख मदत जाहीर केली आहे.
सदनिकांसाठी पैसे भरलेल्यांमध्ये घबराट
काणकोणच्या रुबी रेसिडेन्सी निवासी प्रकल्पातील इमारत कोसळल्यानंतर या इमारतीमध्ये राहणार्या त्याचप्रमाणे सदनिका घेण्यासाठी आगाऊ रक्कम दिलेल्या लोकांमध्ये घबराट पसली आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या मजल्यावर राहणार्या मुंबई येथील सेबस्तीना अर्नेस या महिलेने प्रकल्पाच्या बांधकामाचा पाढाच पत्रकारांसमोर मांडला. ४० लाख रुपये देऊन चार वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या प्लॅटच्या भींतीना तडे गेले आहेत. पावसाळ्यात संपूर्ण इमारत हलत असते. तक्रार केली तरी चौकशी केली जात नाही. सर्वांनाच फसविण्यात आल्याची खंत सदर महिलेने व्यक्त केली. दारे-खिडक्या उघडत नाहीत. जादा रक्कम घेऊनही रेती आणि मातीचा वापर करुन इमारत उभारण्यात आली आहे. साधे कॅलेंडर लावण्यासाठी खिळा ठोकायला गेल्यासही भीतींला भेगा पडतात अशी तक्रार सदर महिलेने केली.
तत्कालीन सरकार
जबाबदार : तवडकर
संपूर्ण दुर्घटनेला काणकोण पालिका, नगरनियोजन खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि त्यावेळचे सरकार जबाबदार असून यातील मुख्य आरोपीना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ७/८ वर्षांपूर्वी डोंगर कापून या ठिकाणी बांधकाम करण्यात आले. त्यावेळी आपण पैंगीण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होतो. मऊमाती, आणि भरावात हे बांधकाम करण्यात आले. मालक प्रदीप सिंग, जगदीप सिंघल, कोस्टल बिल्डर्सचे विश्वास देसाई हे या दुर्घटनेला जबाबदार असल्याचे मत क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रकल्पात क्रीडामंत्री तवडकर,
आशा पारेख यांच्या सदनिका
प्रकल्पात क्रीडामंत्री रमेश तवडकर राहतात. त्याशिवाय त्यांचे स्वत:चे कार्यालयही येथे आहे. सिने अभिनेत्री आशा पारेख, डॉ. शाबा गावकर, डॉ. सूरज मिराशी, राजेश देसाई यांच्या सारखे स्थानिक लोक राहतात. मात्र ८० टक्के सदनिका मुंबई व दिल्लींच्या लोकांनी घेतल्या आहेत. सदर कंपनीची नगर्से, देवाबाग या ठिकाणीही बांधकामे चालू आहेत.
पालिकेकडे फाईल शेवटी
यापूर्वी बांधकामांना परवाना द्यायचा झाल्यास त्यासंबंधी फाईल सर्वप्रथम नगरपालिकेकडे यायची. परंतु नवीन व्यवस्थेप्रमाणे सर्व सोपस्कर पूर्ण करून फाईल शेवटी नगरपालिकेकडे येते, असे नगराध्यक्ष महादेव देसाई, माजी नगराध्यक्ष रमाकांत गावकर सांगितले.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची फाईल २००७ साली काणकोण पालिकेकडे आली. त्यामुळे त्यावेळचे पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगर नियोजन अधिकारी त्याला जबाबदार आहेत. सरकारी यंत्रणा गाफील राहिल्यामुळेच ही दुर्घटना घडली असे मत जिल्हा पंचायत सदस्य दया पागी, जनार्दन भंडारी यांनी व्यक्त केली. सध्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा बरोबर नसल्याचे माजी आमदार विजय पै खोत यांनी सांगितले.
राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीकडून मदतकार्य
रुबी रेसिडेन्सीच्या इमारतीखाली गाडलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम दुसर्या दिवशीही युध्दपातळीवर चालू होते हे काम आता राष्ट्रीय व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले आहे. पुणे येथून खास पथक या ठिकाणी दाखल झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी फुर्तादो यांनी दिली. अग्निशामक दलाचे प्रमुख अशोक मेनन, लष्कराचे प्रमुख ओलाक कुमार, उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, अजित पंचवाडकर, पोलीस निरीक्षक हरिष मडकईकर आणि त्यांचा स्टाफ, मामलेदार रविशेखर निपाणीकर आणि त्याचा स्टाफ या ठिकाणी तळ ठोकून आहे.
पुढील टप्प्यातील काम बंद पाडले
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुर्घटनेची कसून चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. रुबी रेजिडन्सीचे दुसर्या टप्प्यातील बांधकामही बंद करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. वरील अपघातामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणार्या बिल्डर्सचे धाबे दणाणले आहेत.
नगरनियोजन खात्याकडून प्रकल्पाच्या चौकशीस सुरुवात
काणकोण येथील रुबी रेजिडन्सी इमारत कोसळून झालेल्या अपघातानंतर बांधकामाशी संबंधित असलेल्या प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागा झाल्या असून नगर नियोजन खात्याने वरील प्रकल्पाच्या सर्व फाईल्स तपासणीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. मुख्य नगर नियोजक एस. टी. पुत्तु राजू यांनी काल दुपारी घटनास्थळी भेट दिली. वरील प्रकल्पास मान्यता देणार्या अभियंत्यांकडून त्यांनी स्पष्टीकरण मागविले आहे.गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ञांचे पथकही घटनास्थळे दाखल होऊन बांधकामासाठी वापरण्यात येणार्या साहित्याची तपासणी करून आज संध्याकाळपर्यंत अहवाल देण्याची शक्यता आहे.