रुपयाचा नवा नीचांक, ८२.३३ पर्यंत अवमूल्यन

0
15

गेल्या काही दिवसांपासून रुपयाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अद्याप थांबण्याचे नाव घेत नसून, शुक्रवारी रुपयाने नवा नीचांक गाठला आणि बाजारपेठेत चिंतेचे वातावरण पसरले. शुक्रवारी रुपयाने १६ पैशांची मोठी घट नोंदवली. त्यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर थेट ८२.३३ पर्यंत जाऊन पोहोचला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काही जुन्या भाषणांचे व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे.
रुपयाच्या अवमूल्यनाची अनेक कारणे समोर येत असली, तरी त्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींचे प्रमुख कारण दिले जात आहे. याशिवाय, अमेरिकी बॉण्डचे दर, गुंतवणूकदारांमधला निरुत्साह हे घटकदेखील यासाठी कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

काल सकाळी साडेनऊच्या सुमारास रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत ८२.३० इतका होता. याआधीच्या ८१.८९ दरावरून रुपया बाजार उघडताच ८२.१९ वर गेला आणि अजून खाली उतरत ८२.३३ पर्यंत घटला. गुरुवारी तर ५५ पैशांनी रुपया उतरला होता. त्यामुळे दिवसेंदिवस रुपयाच्या होणार्‍या अवमूल्यनामुळे बाजारपेठेत आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्षभरात १० टक्क्यांनी घटला रुपया!
गेल्या वर्षभरात रुपयाने तब्बल १० टक्क्यांची घट नोंदवल्याचे समोर आले आहे. आरबीआयने सातत्याने परकीय गंगाजळीच्या विक्रीतून रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी प्रयत्न करूनही रुपयाचा उलटा प्रवास थांबवण्यात अपयश येत आहे.
रुपया धारातीर्थी पडल्यामुळे आयात महाग होऊन त्याचा थेट फटका नागरिकांना बसणार आहे. रुपयाची पत ढासळल्यामुळे कच्च्या तेलाची आयात, इलेक्ट्रॉनिक वस्तू, परदेशी शिक्षण आणि विदेशी प्रवास महाग होणार आहे. घसरणार्‍या रुपयाचा सर्वांत पहिला परिणाम हा आयातदारांवर होतो. त्यांना वस्तूंच्या खरेदीसाठी अधिक पैसे द्यावे लागतील; मात्र निर्यातदारांना डॉलरच्या बदल्यात अधिक रुपये मिळत असल्याने त्यांना फायदा होणार आहे.