>> कला अकादमी ‘अ’ गट मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर
कला अकादमीने आयोजित केलेल्या ५२ व्या ‘अ’ गट मराठी नाटयस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून रुद्रेश्वर, पणजी यांनी सादर केलेल्या पालशेतची विहीर या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदिवडे यांच्या यळकोट या नाटयप्रयोगास पंचाहत्तर हजार रुपयांचे व्दितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. नटरंग क्रिएशन्स, नार्वे यांच्या आवरण या नाटकाची पन्नास हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके अथर्व वेद – आल्तिनो, पणजी यांच्या राशोमोन आणि श्री बाळसती नाट्यकला संघ, सुकतळी-धारबांदोडा यांच्या तनमाजोरी या नाटकासाठी देण्यात आली आहे.
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक दीपक आमोणकर यांना पालशेतची विहिर या नाटकासाठी प्राप्त झाले असून अजित केरकर यांना यळकोट नाटकासाठी द्वितीय पारितोषिक, तर तृतीय पारितोषिक आवरण नाटकासाठी संतोष शेटकर यांना देण्यात आले.
पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी अभिषेक नाईक यांना (यळकोट) प्रथम पारितोषिक, व्दितीय पारितोषिक मयूर मयेकर यांना (राशोमोन) प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे दीपक आमोणकर (पालशेतची विहिर), मिलिंद बर्वे (आवरण), ऋतुज शेट वेरेकर (तनमाजोरी), व्यंकटेश गावणेकर (बूड बूड रे घागरी), सौरभ कारखानीस (दो बजनिए), अमोघ बुडकूले (यळकोट), विश्वजीत ङ्गडते (पुन्हा एकदा) यांना प्राप्त झाली.
स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी सौ. सिध्दी उपाध्ये यांना (पालशेतची विहीर) प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून ममता शिरोडकर यांना (आवरण) द्वितीय पारितोषिक संपादन केले. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे कु. प्रांजल मराठे (मंजिरी- यदृच्छा), सौ. मंगला जांभळे (शनिचरी ड्ढ रुदाली), प्रज्ञा कामत (अमू- कोमल आणि तिव्र खिडक्या), स्नेहल शेट्ये (स्त्री- राशोमोन), साध्वी मावजेकर (सुनंदा- यळकोट), पूर्ती सावर्डेकर (अंजना- बॉयल्ड बिन्स् ऑन टोस्ट), आणि पद्मा भट (मायावती- चाङ्गा) यांना प्राप्त झाली.
उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक मयूर कांबळी याना बॉयल्ड बिन्स ऑन टोस्ट नाटकासाठी प्राप्त झाले असून शंभूनाथ केरकर यांना यळकोट नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. पालशेतची विहीर या नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठी सतीश नार्वेकर यांनी पारितोषिक मिळविले तर प्रशस्तीपत्र आवरण नाटकासाठी संतोष शेटकर यांना देण्यात आले. वेषभूषेसाठीचे बक्षीस सौ. मनुजा नार्वेकर लोकूर यांना पालशेतची विहीर नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तीपत्र प्रियांका नाईक यांना चाङ्गा नाटकासाठी देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे पारितोषीक केदार मणेरीकर यांनी कोमल आणि तिव्र खिडक्या या नाटकासाठी प्राप्त केले असून सनी राऊळ यांना राशोमान या नाटकासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले.
रंगभूषेचे पारितोषिक एकनाथ नाईक यांनी पालशेतची विहीर या नाटकासाठी संपादन केले. तर अमिता नाईक यांना दो बजनिए साठी प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्वतंत्र नाट्यसंहिता लेखनाचे प्रथम पारितोषिक विजयकुमार नाईक यांना पालशेतची विहिर नाटकासाठी तर द्वितीय पारितोषिक मिलिंद बर्वे यांना आवरण नाटकासाठी देण्यात आले असून खास स्पर्धेसाठी नाट्यसंहिता अनुवादनाचे पारितोषीक ज्ञानेश मोघे यांना राशोमोन या नाटकासाठी देण्यात आले आहे.
या स्पर्धेचे परीक्षण सुनील खानोलकर (मुंबई), सुभाष भागवत (मुंबई) व राहूल अनंत वैद्य (मुंबई) या परीक्षक मंडळाने केले.