अश्विन मास प्रकटतो तोच मुळी नक्षत्रांची झिळमीळ घेऊन. निरभ्र, नीतळ आकाश मध्यरात्रीचे अनुभवावे. खाली जमिनीवर राहून जर वर नक्षत्रांचे लावण्य नजरेत साठवून घ्यायचे तर मग झाडांची नक्षीसुद्धा त्यावर कोरल्यासारखी दिसते. बदलणारा ऋतुचक्रातील महिना कोणताही असू दे, त्या-त्या मासाला वेढून राहिलेला, बदलत जाणारा सभोवताल त्याच्या अनुभूतीसकट स्वीकारण्याची एक धडपड चालू असते. प्रत्येक पुनव ही अशीच असते माझ्यासाठी. वरच्या गॅलरीत बसायचे. दूरपर्यंत पसरलेले कब्रस्थान, त्याला असलेल्या दगडी भिंतीला अगदीच खेटून असलेला कदंब वृक्ष. खरं तर तिथे भिंत उभारण्यापूर्वीपासून कदंब उभा होता… पक्ष्यांना अंगाखांद्यावर खेळवत. चांदण्यारात्री नक्षत्रांशी संवाद साधीत. इथं माणसांनाच वाटलं की मेल्यानंतरसुद्धा एक चौकट असावी… जातीची… पातीची… धर्माची…. त्यामुळेच तिथे मर्यादा पडली. कदंबाला बिचार्याला हे सारं सोसावं लागतं.
खरं तर माणसांना तो तिथं नकोच होता. कशाला तर म्हणे त्या वृक्षामुळे तेथील मृतात्म्यांना इजा पोहोचेल. असं नाहीच मुळी. उटल धर्मग्रंथातच सांगितलं आहे, जिथे तुम्ही प्रेतं पुराल ना तेथे त्या निस्तेज डोक्याजवळ एखादं तरी झाड लावा… पण ते तसेच राहिले पानात दडून. कदंबावर कुर्हाड चालविण्यासाठी काही हात पुढे आले तेव्हा त्यांना या विचारांचा संदर्भ दिला. थोडेसे मतपरिवर्तन झाले. मग त्याला तिथेच ठेवून, एकदम खेटूनच भिंत उभारण्यात आली. आता कदंबवृक्ष जगतो आहे. वारा आला की त्याचे घर्षण होते. चामडी सोलून निघते. पण वर्षातून दोन वेळेला फुलायचे मात्र त्यांनी बंद ठेवले नाही. तो फुलतोच आणि त्याचे फुलणे-बहरणेसुद्धा मला अश्विन मासाचीच आठवण करून देते.
रात्रीच्या नीरव शांततेत, मध्यरात्र उलटून गेली की मी आणि समृद्धी- आम्ही बराच वेळ बसतो कुठल्या कुठल्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी. त्यावेळी समोर आणि बाजूच्या भिंतीवर त्याची सावली पडते. एखाद्या चित्रकाराने चित्र आतील भावभावनांसकट जिवंत करावे एवढी ती सावली सजीव असते. हा महिना असा सोनसळी, हिरव्या, पोपटी, लाल, कोवळ्या लुसलुशीत संवेदनांचा वाटतो. एक अनोखे सर्जन मातीतून रुजून येते. शेतेभाटे पिकलेली. अगदीच सोनसळी नाहीत तर थोडीशी पोपटी किनार घेऊन डोलणारी. फळण्यासाठी परिपुष्ट होऊन सडसडीत झालेली आंब्या-फणसांची झाडे, एरव्ही दुसर्या मौसमात सहजासहजी दिसत नाहीत अशी झेंडूची, कोरटणीची फुले… कंदमुळे… झाडे, पशुपक्षी, तृणपाती, फुले… सगळ्यांतच नवचैतन्य… उत्साह… या सार्यांचाच ‘उत्सव’ चालू असतो.
मला अजूनही आठवतात ते नवरात्रातले दिवस… घटस्थापना जवळ येऊ लागली की आईची लगबग वाढायची. कशाला तर मधल्या चौकात देवघराच्या जागेत रुजवण घालण्यासाठीची तिची ती तयारी असायची. स्वच्छ जागेवरची माती खणून आणून तिचा चौकोनी थर करायचा. त्यावर मके, नाचणी, गहू इत्यादी नऊ प्रकारची धान्ये पेरायची. दर दिवशी दूध, हळदीचे पाणी यांचे शिंपण हे रुजवण अंकुरावे म्हणून केले जायचे. हे शिंपण करतानासुद्धा मनाचे पावित्र्य, तनाची सुचिता पाळली जायची. नवव्या दिवशी तर पिवळ्या-पोपटी रंगाच्या पातीची कोवळी लवलव एक इंच वर यायची. हेच ते ‘रुजवण’ असायचे. ती पाती काढून पहिल्यांदा देवळात अर्पण करायची, त्यानंतर सुवासिनींना द्यायची. ही परंपरा तिने बरीच वर्षे पाळली. मलाही त्या रुजवणाच्या पात्यांचे बरेच आकर्षण होते. आईचा डोळा चुकवून मी अगदी हलका हात त्या कोंबांच्या लवलवीवर फिरवायचे. ते स्पर्शसुख खूप मोठे होते. इतर सवाष्णींबरोबर माझ्याही केसात हे रुजवण विराजमान व्हायचे.
देवळातील तरंगावर वाहण्यासाठी आई माझ्याजवळ या पात्यांची लहान मोळी करून द्यायची. ती मी घेऊन जायचे खरी, पण वाटेत त्याच्यातील चारदोन पाती वास घेऊन माझ्या केसांत स्थिरवायची. पुढे अनेक कारणांमुळे ही परंपराच खंडित झाली. अजूनही मला ती उणीव भासते. आज जेव्हा तटस्थपणे या सगळ्याच भावजीवनाचा मी विचार करते तेव्हा मला वाटते की, त्यावेळी नवरात्रात हे जे रुजवण घरात, मंदिरात घातले जायचे, शक्ती उपासनेसाठी भजन-कीर्तनाच्या माध्यमातून रात्री जागवणे व्हायचे. हे नुसतेच प्रतिकात्मक नव्हते, तर नकळतपणे घर-मंदिरे या जागा समाजमनाला विचारांचे, आदर्श जीवनमूल्यांचे, संस्कार देणार्या शिकवणींचे ते ‘रुजवण’ असायचे. ज्या बिजाला भूमी ओटीपोटीत अलवारपणे धरून खूप नजाकतीने, जिव्हाळ्याने रुजवते, अंकुरण्यासाठी ऐसपैस ‘स्पेस’ देते तिथे मोकळेपणा, परिपक्वता, नात्यांचे अतूट बंध निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. हे बंध नुसतेच माणसांचे माणसांशीच नसतात. त्यात सभोवतालाला, निसर्गाला, ऋतुचक्रातील प्रत्येक बदलाला जागा असते. अश्विन मास शक्तीची, सौंदर्य आणि भक्तीची, समरसता यांची ‘रुजवण’ करणारा मास आहे.