रुग्णांना फक्त गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचाच आधार

0
2

सामाजिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा इस्पितळात दाखल 56 टक्के रुग्ण गोमेकॉत हलवले

राज्यातील सामाजिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा इस्पितळे यांच्या दयनीय अवस्थेचा पाढा वाचताना काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात वरील ठिकाणी उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी तब्बल 56 टक्के रुग्णांना नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) हलवावे लागल्याचे सभागृहाच्या नजरेत आणून दिले.

काल गोवा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आलेमाव यांनी यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मागील पाच वर्षांच्या काळात राज्यातील सामाजिक आरोग्य केंद्र, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा इस्पितळे आदी ठिकाणी उपचारासाठी भरती करण्यात आलेल्या 1,80,256 रुग्णांपैकी 1,00,872 रुग्णांना गोमेकॉमध्ये हलवावे लागल्याची लेखी माहिती दिली होती.
त्यावर बोलताना आलेमाव म्हणाले की, राज्यातील सामाजिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे असोत अथवा जिल्हा इस्पितळे या इस्पितळांत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी तब्बल 56 टक्के रुग्णांना नंतर उपचारासाठी गोमेकॉत हलवण्यात आले. वरील इस्पितळांत उपचारासाठीच्या आवश्यक त्या सुविधांचा अभाव असल्यानेच तेथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी तब्बल 56 टक्के रुग्णांना गोमेकॉत हलवावे लागले असल्याचे आलेमाव यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेत आणून दिले.

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ तसेच फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळाच्या दर्जाचा समाचार घेताना या इस्पितळांना खरे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रेच म्हणायला हवे, तेथे आवश्यक ते तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे मशिन्स, कॅथलॅब यासारखी मशिन्स व अन्य सुविधा नसल्याचे यावेळी आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले. या इस्पितळांचा दर्जा वाढण्यासाठी आरोग्यमंत्र् यांनी प्रयत्न करायला हवेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्हा इस्पितळांत उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावत असल्याचे आलेमाव म्हणाले. मडगाव जिल्हा इस्पितळात विनाविलंब हृदयरोगतज्ज्ञ, मेंदू व मज्जासंस्था तज्ज्ञ यांच्याबरोबरच, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ व अन्य तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी आलेमाव यांनी यावेळी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, एल्टन डिकॉस्टा आदींनी भाग घेतला.

गोवा आरोग्य खाते हे अन्य राज्यातील आरोग्य खात्यांपेक्षा चांगले आहे. राज्यातील इस्पितळात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याबरोबरच अन्य आवश्यक ती सगळी साधनसुविधा व आधुनिक उपकरणे आणून इस्पितळे सुसज्ज करण्यात येतील. त्यासाठी वेळोवेळी सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी चर्चेवेळी स्पष्ट केले.