- अनुराधा गानू
आजच्या पिढीचे हेच दुर्दैव आहे की ‘पैसा’ म्हणजेच ‘मान’ असंच समीकरण त्यांना शिकवलं गेलंय. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळत नाही म्हणजे रिस्पेक्ट नाही असंच त्यांना वाटतं. आपण मोठी माणसं त्यांना कसा आशीर्वाद देतो लक्षात घ्या, ‘बाबा, शिकून खूप मोठा हो, मोठ्या पगाराची नोकरी मिळव.’
हल्लीच नातवाचं आणि माझं बोलणं चालू होतं. १०वी पास झालाय. ११वीला ऍडमिशन घेतलीय. मला म्हणाला, ‘‘आज्जी, मला इंडियात राहायचंच नाहीयेय. इंडियामध्ये आपल्याला काही रिस्पेक्टच नाहीयेय. मला ना अमेरिकेत जायचंय.’’ मी म्हटलं, ‘‘जा तू अमेरिकेत पण इथे रिस्पेक्ट मिळत नाही म्हणून नव्हे ..हा तर पलायनवाद झाला.’’ तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलाचे विचार ऐकले. बरं नाही वाटलं. विशेषतः रिस्पेक्ट हा शब्द खटकलाच. नातू म्हणजे त्याच्या पिढीचं ते प्रातिनिधिक स्वरूप.
या मुलांना, या पिढीला रिस्पेक्ट ही इतकी सहज मिळणारी गोष्ट वाटतेय का? रिस्पेक्ट या शब्दाची व्याप्ति, व्याख्या त्यांना कळलेलीच नाही. रिस्पेक्ट हा आपल्याला कोणी असाच आणून देत नाही किंवा तो विकतही घेता येत नाही. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय कोणत्याही देशात तुम्हाला रिस्पेक्ट मिळणारच नाही. पण त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारीच नसते. कारण या पिढीला न मागताच सगळं ताट पुढ्यात मिळण्याची सवय झालीय. त्यामुळे काही मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात हे त्यांना माहीतच नाही. अर्थात संपूर्ण दोष त्या मुलांचा आहे असं मलाही वाटत नाही आणि ते पटणारं नाही. पन्नास टक्के तरी दोष पालकांचा आहे. कारण त्यांनी मुलांना तसंच वाढवलंय. ही मुलं स्वातंत्र्यात जन्माला आलेली आहेत. त्यांना स्वतःच्या देशाबद्दल, माहितीच नाहीये. म्हणून त्यांचे हे असे विचार आहेत.
आता मान किंवा रिस्पेक्ट मिळत नाही म्हणजे काय आणि अमेरिकेत रिस्पेक्ट मिळतो म्हणजे काय? अमेरिकेत किंवा कोणत्याही परदेशात गेलेल्या आपल्या मुलांपैकी किती टक्के मुलं तिथल्या नोकर्यांमध्ये सगळ्यांत उच्च पदांवर आहेत.. याचा विचार व्हायला पाहिजे. आता पैसा हाच जर रिस्पेक्टचा मापदंड असेल तर पुढं काय बोलणार? आपली मुलं किंवा आपले लोक तिथे जाऊन भरपूर पैसा मिळवतात म्हणून त्यांना आपण इंडियात रिस्पेक्ट देतो, हे मात्र नक्की. म्हणजे रिस्पेक्ट हा त्या माणसाला नव्हे तर त्याच्या पैशाला मिळतोय. त्याकरिता लागणार्या शिक्षणासाठीचा पैसा मात्र इंडियानेच खर्च केला आहे हेही विसरून चालणार नाही.
आजच्या पिढीचे हेच दुर्दैव आहे की ‘पैसा’ म्हणजेच ‘मान’ असंच समीकरण त्यांना शिकवलं गेलंय. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळत नाही म्हणजे रिस्पेक्ट नाही असंच त्यांना वाटतं. आपण मोठी माणसं त्यांना कसा आशीर्वाद देतो लक्षात घ्या ना… ‘‘बाबा चांगला शीक. शिकून खूप मोठा हो आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळव.’’
स्वातंत्र्यानंतर काही काळपर्यंत आपल्या लोकांना मान होता. पण त्यानंतर भारतात अशी काही सरकारे राज्य करू लागली की त्यांनी देशाची सगळी परिस्थितीच बदलून गेली. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार असा घेतला जाऊ लागला. राज्यकर्त्यांची स्वातंत्र्यपूर्व काळातील मानसिकता स्वातंत्र्योत्तर काळात बदलली. भ्रष्टाचाराचं पिक वाढलं. हातातल्या सत्तेचा दुरूपयोग होऊ लागला. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरू लागल्या. ज्याच्या हातात पैसा आणि सत्ता त्याला मान.. अशी समीकरणे होऊ लागली. मग अशा परिस्थितीत आजच्या पिढीची अशी धारणा होणं हे चुकीचं नाही. पण ती परिस्थिती बदलणंही त्यांच्याच हातात आहे हेही तितकंच खरं आहे.
या तरुण पिढीनं बोलण्याअगोदर आपल्या देशाला मान द्यायला शिकावं. तुम्ही देशाकडे रिस्पेक्ट मागताना, देशाचा मान तुम्ही किती ठेवता… याचा विचार करायला पाहिजे. थिएटरमध्ये वंदेमातरम् सुरू झालं की काही मुलं उठतही नाहीत. हा त्या झेंड्याचा, देशाचा अपमान नाही का?… आणि तुम्ही रिस्पेक्ट मागताय? आपल्या देशात मोठमोठ्या पदव्या घेतलेली माणसं आहेत. डॉक्टर्स आहेत. पण त्यांना आमची संस्कृतीच कळली नाही. म्हणूनच एखादी शस्त्रक्रिया करताना एखाद्या सामान्य माणसाची किडनी काढून त्याचा व्यापार करण्यापर्यंत त्यांची मजल जाते आणि त्यांना रिस्पेक्ट हवाय?
आजच्या तरुण पिढीनं मान मिळेल असं कर्तृत्व करून दाखवावं. शिक्षणाचा उपयोग चांगल्या कामासाठी करून दाखवावा. पण तसं न करता आजची तरुण पिढी दारू, नशा, पार्ट्या यात गुंतून पडतेय. बलात्काराच्या केसेसमध्ये तरुणाईच जास्त अडकतेय. ज्यांना स्वतःच्या आयाबहिणींच्या अब्रूची चाड नाही त्यांना रिस्पेक्ट कोण देणार?
आपल्या इंडियात रघुनाश माशेलकर, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, अब्दुल कलाम आझाद, बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, डॉ. वैद्य अशी कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगात ‘रिस्पेक्ट’ मिळवलाय. त्यांना रिस्पेक्ट मिळवण्यासाठी कुठेही अमेरिकेत जाण्याची गरज पडली नाही.
सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, आशा भोसले, डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, शरद पोंक्षे या अशा विविध क्षेत्रातील लोकांनी आपल्या कर्तृत्वानं रिस्पेक्ट मिळवलाय. पण आमच्या तरुण पिढीला हे कोणीच उमगले नाहीत. कळले नाहीत आम्हाला विवेकानंद कळले नाहीत, आम्हाला वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस कळले नाहीत. आम्हाला आमचा इतिहास कळला नाही. आमची संस्कृती कळली नाही आणि एकूण काय आम्हाला आमचा देशच कळला नाहीये आणि हे सर्व जाणून घेण्याची आमची इच्छाही नाहीये. म्हणून आम्हाला अमेरिकेत जायचंय. पण… मग….
ही परिस्थिती बदलण्यासाठी कोण प्रयत्न करणार? यासाठी समाजातील, राजकारणातील वाईट गोष्टी, भ्रष्टाचार, भ्रष्टाचारी माणसं, आपली मनोवृत्ती उलथून टाकण्याची ताकद आजच्या पिढीत आहे. नक्कीच आहे. पण ही पिढी सुस्त आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. हेच तरुण पेटून उठतील आणि परिस्थिती बदलवतील. आपल्या कामाने आपले कर्तृत्व सिद्ध करतील तर रिस्पेक्टच्या मागे त्यांना धावावं लागणार नाही. रिस्पेक्टच त्यांच्या मागे धावून येईल. मग रिस्पेक्टसाठी अमेरिकेपर्यंत धावण्याची दमछाक करावीच लागणार नाही.