रिवणच्या ग्रामसभेत सांगे आयआयटी प्रकल्पास मान्यता देणारा ठराव संमत

0
6

सांगे तालुक्यातील रिवण ग्रामपंचायतीच्या काल रविवारी झालेल्या ग्रामसभेत आयआयटी प्रकल्पाला मान्यता देणारा ठराव एकमताने संमत करण्यात आला. आयआयटी संकुलाला ‘ऋषिवन’ नाव देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रिवण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला समाजकल्याणमंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांची खास उपस्थिती होती. मंत्री फळदेसाई यांनी आयआयटी संकुलाबाबत सविस्तर माहिती दिली. आयआयटी संकुलातील जागेतील काही प्रश्न असल्यास त्यावर सामंजस्याने तोडगा काढण्यात येणार आहे. आयआयटी संकुलामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. आयआयटी संकुल प्रकल्पाबाबत इतर प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

आयआयटीबाबत ग्रामसभेत विविध प्रश्न उपस्थित झाले व त्याबद्दल समर्पक उत्तरेही देण्यात आली. या ग्रामसभेत आयआयटी संकुलाला कुणीही विरोध केला नाही. यावेळी सरपंच वैशाली नाईक, उपसरपंच सूर्यकांत नाईक व इतर पंच सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात आयआयटी संकुलाच्या जागेचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे. काणकोण, सत्तरी, सांगे येथे जागेसाठी प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, विरोधामुळे जागेचा प्रश्न रेंगाळला. सांगेचे आमदार फळदेसाई यांनी आयआयटी संकुल सांगे तालुक्याच्या बाहेर जाऊ नये म्हणून रिवण येथे नवीन जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सुमारे 10 लाख चौरस मीटर जमीन संपादनाबाबत सूचना जारी केली आहे. रिवण पंचायत मंडळाने या प्रकल्पाला संमती दर्शविली होती. आता, रिवण पंचायतीच्या ग्रामपंचायतीने आयआयटी संकुलाला हिरवा कंदील दाखविला आहे.