पुढील वर्षात भारतात पूर्णपणे भारतीय असलेले ५ जी नेटवर्क सुरू करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावेळी रिलायन्सने जिओ मीटद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.
५ जी स्पेक्ट्रमसाठी आवश्यक परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लॉंच करण्यासाठी जिओ सज्ज असल्याचे अंबानी म्हणाले. तसेच हे तंत्रज्ञान आपण जगामध्ये निर्यात करण्याएवढे सक्षम बनू असेही त्यांनी यावेळी सांगितले. अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा दाखला देत जिओ याच दिशेने वाटचाल करत असल्याचे आणि संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा केवळ वापरच नाही तर जगाला डिजिटल तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवल्याचे यावेळी नमूद केलं. जिओचे तंत्रज्ञान शून्यापासून निर्माण केलेले असून १०० टक्के भारतीय आहे. जिओ आता शून्य कर्ज असलेली कंपनी असल्याचे सांगताना जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल करत असलेल्या ३३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा दाखलाही त्यांनी दिला.
दरम्यान, या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आघाडीची टेक कंपनी गुगल मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. तसेच, गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला २ जी मुक्त करू असेही अंबानी यावेळी म्हणाले. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल ३३ हजार ७३७ कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती यावेळी अंबानी यांनी दिली.