अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांतील आपल्या उमेदवारांबाबत काँग्रेसने राखलेली गोपनीयता अखेरीस तेथील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निकाली निघाली. राहुल गांधी हे अमेठीला रामराम ठोकून आई सोनिया यांच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि भगिनी प्रियांका मात्र यावेळीही निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहील हे काल स्पष्ट झाले. स्मृती इराणींनी आव्हान उभे केलेल्या अमेठीतून राहुलऐवजी किशोरीलाल शर्मा ह्या गांधी घराण्याच्या निष्ठावंताला उमेदवारी दिली गेली आहे. अमेठीतून न लढता रायबरेलीतून लढण्याच्या राहुल यांच्या या निर्णयाला पळपुटेपणा ठरवण्याची संधी भाजप आता घेईल. शिवाय राहुल वायनाडमधून निवडणूक लढवत असल्याने दोन्हींकडून निवडून आल्यास ते रायबरेलीची जागा सोडतील, त्यामुळे अशा उमेदवाराला निवडूनच का देता असा सवालही भाजप रायबरेलीच्या मतदारांना विचारील, परंतु काँग्रेसने प्राप्त परिस्थितीत शहाणपणाचा निर्णय घेतला आहे असेच म्हणावे लागेल. राहुल यांच्यासाठी अमेठीच्या तुलनेत रायबरेली हा सुरक्षित मतदारसंघ आहे, कारण गेल्या चार निवडणुकांतून सोनिया तेथून सातत्याने निवडून येत राहिल्या आहेत. अमेठीप्रमाणे तो मतदारसंघ भाजपला खेचून घेता आलेला नाही. अमेठीत मागील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव करून स्मृती इराणी जायंट कीलर ठरल्या होत्या. रायबरेली त्या तुलनेत सुरक्षित जागा आहे. सोनियांनी राजस्थानमधून राज्यसभेवर, डॉ. मनमोहनसिंग यांचा कार्यकाल संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर जाणे पसंत केल्याने रायबरेलीमध्ये लोकसभा निवडणुकीत प्रियांकांना उतरवले जाणार का याबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले होते, परंतु भाजपने ऐरणीवर आणलेल्या ‘परिवारवादा’च्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर प्रियांकांनी निवडणुकीपासून सध्या तरी दूर राहायचे ठरवलेले दिसते. त्या निवडणुकीस उभ्या राहिल्या असत्या, तर गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्य राजकारणात असल्याच्या मुद्द्याला भाजपने निश्चित केंद्रस्थानी आणले असते आणि घराणेशाहीचा आरोप अधिक ठळक केला असता. स्वतः प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा प्रियांका यांचा निर्णय काँग्रेस उमेदवारांस दिलासादायक ठरेल. अमेठी आणि रायबरेली हे दोन्हीही मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचे बालेकिल्ले होते हे खरे आहे, परंतु गेल्या काही वर्षांत, विशेषतः मोदी लाटेत ते खिळखिळे होत चालले आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे. 2004 साली अमेठीची जागा सोनियांनी पुत्र राहुलसाठी सोडली. तेथून ते दोन निवडणुकांत निवडूनही आले, परंतु तेथील राहुल यांची मतांची आघाडी कमी कमी होत शेवटी गेल्या निवडणुकीत त्यांच्यासारख्याच बाहेरच्या उमेदवार असलेल्या स्मृती इराणींकडून पंचावन्न हजार मतांनी पराभव पत्करण्याची पाळी राहुलवर आली. रायबरेलीचा गड सोनियांनी राखला खरा, परंतु तेथेही गेल्या दोन निवडणुकांत सोनियांची मतांची आघाडी अर्ध्यावर उतरली आहे ही वस्तुस्थिती आहे. 2014 मधील साडेतीन लाखांची आघाडी 2019 मध्ये 1 लाख 67 हजारांवर आली. ही कमाल करणारे भाजपचे उमेदवार दिनेशप्रतापसिंग यांनाच पक्षाने तेथे पुन्हा एकवार संधी दिली आहे आणि यावेळी ते राहुल गांधी यांच्याशी लढणार आहेत. अमेठीत विजय मिळवल्यानंतर मतदारांना दिलेल्या वचनाप्रमाणे स्मृती इराणींनी तेथे घरदेखील बांधले, परंतु अमेठीकडे राहुलनी पाठ फिरवल्याने आणि आपल्याऐवजी किशोरीलाल शर्मा यांना उभे केल्याने तेथील चुरस कमी झाली आहे. किशोरीलाल शर्मा आजवर काँग्रेसशी व गांधी घराण्याशी एकनिष्ठ तर राहिले आहेतच, परंतु सोनियांच्या आजवरच्या विजयात त्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे आता स्वतः ते काँग्रेसचा हा एकेकाळचा बालेकिल्ला भाजपकडून पुन्हा हिसकावून घेऊ शकतील का हे पाहावे लागेल. अमेठी मतदारसंघ 1967 साली निर्माण करण्यात आला, परंतु रायबरेली हा 1952 पासून गांधी – नेहरू घराण्याच्याच ताब्यात राहिला आहे. 52 आणि 57 च्या निवडणुकीत तो फिरोझ गांधींकडे होता, मग इंदिरा गांधींशी तो निगडीत झाला. नंतरच्या काळात अरूण नेहरू, शीला कौल आदींच्या रूपाने घराण्याकडेच राहिला आणि राहुल यांना अमेठी सोपवल्यानंतर सोनियांनी त्यात बस्तान बसवले. आता राहुल तेथे आले आहेत. पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी तेथे मतदान होणार आहे. दोन्हींच्या विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. उत्तर प्रदेशात सत्ता भाजपची आहे. केंद्रात अजूनही मोदींचे वारे आहे. या परिस्थितीत काँग्रेस आपले अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ स्वतःकडे खेचून घेऊ शकणार का ह्याबाबत देशात निश्चितच कुतूहल आहे.