>> रायबरेली मतदारसंघाचे खासदार म्हणून राहणार
>> प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघाचा खासदारकीचा राजीनामा देणार असून, ते रायबरेलीचे खासदार राहतील. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. सोमवारी काँग्रेसच्या 2 तासांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. त्यामध्ये लोकसभा अध्यक्ष आणि उपसभापती निवडणुकीचीही चर्चा झाली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेची निवडणूक उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघामधून लढवली होती. या दोन्हीही मतदारसंघात राहुल गांधी यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. मात्र, आता राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून राजीनामा देणार आहेत. याबाबत काल त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
वायनाड आणि रायबरेलीशी माझे भावनिक नाते आहे. मी गेली 5 वर्षे वायनाडचा खासदार होतो. मी लोकांचे प्रेम आणि समर्थन यासाठी आभारी आहे. प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील; पण मी वेळोवेळी वायनाडलाही भेट देणार आहे. रायबरेलीशी माझा प्रदीर्घ संबंध आहे, मला पुन्हा त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे; पण हा निर्णय कठीण होता, असे राहुल गांधी म्हणाले.
नियम काय आहेत?
राज्यघटनेनुसार, एखादी व्यक्ती एकाच वेळी संसदेची किंवा दोन्ही सभागृह आणि राज्य विधानमंडळाची सदस्य होऊ शकत नाही. तसेच ते एका सभागृहात एकापेक्षा जास्त जागांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. घटनेच्या कलम 101 (1) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 68 (1) नुसार, जर लोकप्रतिनिधी दोन जागांवरून निवडणूक जिंकला, तर त्याला 14 दिवसांच्या आत एक जागा सोडावी लागते. परिणाम जर कोणी जागा सोडली नाही तर त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात.