>> शेवटच्या दिवशी दाखल केला उमेदवारी अर्ज; अमेठीतून के. एल. शर्मा रिंगणात
अनेक दिवस चालढकल केल्यावर राहुल गांधींची वायनाडनंतर दुसऱ्या एका मतदारसंघातून काल उमेदवारी अखेर जाहीर झाली. राहुल गांधी यावेळेस अमेठीतून नव्हे, तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. अमेठीतून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के. एल. शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल या दोन्ही मतदारसंघांतून अर्ज भरण्याची मुदत संपत होती. त्याचदिवशी सकाळी दोघांना या मतदारसंघांतून उमेदवारी जाहीर झाली. यानंतर राहुल गांधी यांनी काल रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, बहीण प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते. किशोरीलाल शर्मा यांनीही अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले.
रायबरेली आणि अमेठीतून काल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे; परंतु उमेदवारी जाहीर झाली नव्हती. सकाळीच काँग्रेसने परिपत्रक प्रसिद्ध करत राहुल गांधींना उमेदवारी जाहीर केली. कालपर्यंत अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या; परंतु आता ते रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. अमेठीपेक्षा रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 2019 साली रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडून आल्या होत्या. रायबरेलीत कायम काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे रायबरेली मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे. गांधी घराण्यातल्या दिग्गज नेत्यांचा एकेकाळचा गड अर्थात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के. एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अमेठीची बदललेली गणिते पाहता गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला जवळपास 49 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला 40 ते 43 टक्के मते मिळाली होती. रायबरेलीच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. रायबरेलीत काँग्रेसचा वोट शेअर हा 45 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर भाजपचा वोट शेअर हा 33 टक्के होता. त्यामुळे रायबरेली हा मतदारसंघ काँग्रेससाठी जास्त सोईस्कर आहे.
… तर एक जागा सोडावी लागेल
राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली, तर त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर ते वायनाड किंवा रायबरेलीतील एक जागा सोडू शकतात आणि प्रियांका तेथून निवडणूक लढवू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.