राहुल गांधींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश

0
2

>> बंदीनंतरही गुवाहाटीत प्रवेशाचा प्रयत्न; काँग्रेस कार्यकर्ते-पोलिसांमध्ये झटापट

काँग्रेस नेते राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममध्ये आहे. ही यात्रा काल गुवाहाटी शहरातून जाणार होती; पण वाहतूक कोंडीच्या कारणास्तव यात्रेला शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती, तरी देखील काँग्रेस कार्यकर्ते तेथे जमा झाले आणि पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्यात आले. यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत झटापट झाली. आम्ही फक्त बॅरिकेड्स तोडले आहेत, कायदे नाहीत असे म्हणत राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले. बॅरिकेड्स तोडण्यास राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शंकरदेव सत्र देवस्थानात दर्शन घेण्यास तसेच पदयात्रा व मेळावा घेण्यास जिल्हा प्रशासनाकडून मनाई करण्यात आल्यानंतर कालही त्यांच्या यात्रेला गुवाहाटी शहरात परवानगी देण्यात आली नाही.

गुवाहाटी शहरात यात्रा येण्याआधीच पोलिसांनी राहुल गांधी यात्रा अडवली. राहुल गांधी यांची यात्रा विना परवानगी शहरात येत होती. शहरात यात्रेच्या प्रवासाला परवानगी नसल्याने आम्ही राहुल गांधी यांना रोखल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. यावेळी बसमधून प्रवास करणाऱ्यांची पोलिसांशी झटापट झाली. कार्यकर्ते बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस कार्यकर्त्यांना शहरात येऊ देत नाहीत हे राहुल गांधी दुरून पाहत होते.

मग ‘त्यांना’ का रोखले नाही? : राहुल गांधी
बजरंग दल आणि जे. पी. नड्डा यांच्या रॅली या मार्गाने गेल्या. त्यावेळी त्यांना का रोखले नाही. आत्ताच पोलीस आम्हाला का रोखत आहेत. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते खंबीर आहोत, आम्ही बॅरिकेड्स तोडले आहेत, पण कायदा मोडणार नाही, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.