एकेका राज्यातून सत्ता चालली असली तरी राष्ट्रीय स्तरावर अजूनही आपले अस्तित्व असलेला आणि त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे बिरुद कसेबसे टिकवून धरलेला विरोधी पक्ष कॉंग्रेस लवकरच नेतृत्वबदलाला सामोरा जाणार असल्याचे अधिकृतरीत्या सूतोवाच झाले आहे. अर्थातच, नेहरू – इंदिरा – राजीव – सोनिया आणि राहुल असेच हे घराण्यांतर्गत स्थित्यंतर राहणार आहे. मध्यंतरी पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाऐवजी अन्य नेतृत्वाकडे देण्याचा प्रयोग सीताराम केसरींच्या रूपाने झाला आणि फसला देखील! त्यामुळे अन्य कोणत्याही पर्यायांची चाचपणी न करता राहुल यांच्याच गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ पडेल हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. होणार, होणार म्हणता म्हणता गेली अनेक वर्षे रखडलेला हा राहुल गांधी यांचा पदाभिषेक एकदाचा या दिवाळीनंतर पार पडेल अशी अपेक्षा आहे. राहुल यांच्या नेतृत्वक्षमतेविषयीची प्रश्नचिन्हे त्यामुळे पुन्हा एकवार डोके वर काढू लागली आहेत. त्यांच्या राजकारणाला सदैव ‘हिट अँड रन’ स्वरूपाचे राजकारण असेच म्हटले जात आले, कारण प्रत्येकवेळी अचानक प्रकट व्हायचे, एखादे दणकेबाज भाषण करायचे अथवा एखादे चमकदार टीकास्त्र सोडायचे आणि नंतर पुन्हा गायब व्हायचे असाच प्रकार त्यांच्याकडून सतत होत आला. पक्षाच्या आघाडीवर राहून लढण्याच्या बाबतीत ते सतत कमी पडले. त्यामुळे वेळोवेळी चेष्टेचा विषयही ठरले. एकीकडे नरेंद्र मोदींचा करिष्मा वाढत चालला असताना दुसरीकडे त्यांना तुल्यबळ असे नेतृत्व कॉंग्रेस पक्षाने समोर उभे करणे आवश्यक होते, परंतु ते घडू शकले नाही. सोनिया गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत स्वतःची एक खंबीर, कणखर नेत्याची प्रतिमा निर्माण केली. पुरुषप्रधान राजकीय संस्कृतीमध्ये आणि त्यातही कॉंग्रेससारख्या पक्षाला नेतृत्व देणे ही सोपी बाब निश्चितच नव्हती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी एक विदेशी स्त्री असूनही स्वतःची पूर्णतः भारतीय स्त्रीची प्रतिमा अत्यंत जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक निर्माण केली. जनमानसामध्येही आदराचे स्थान मिळवले. पतीच्या निधनानंतर राजकारणातून त्या सहज बाजूला फेकल्या गेल्या असत्या, परंतु आपले राजकीय अस्तित्व त्यांनी कायम राखले, इतकेच नव्हे तर पक्षाच्या सरकारांवर पूर्ण नियंत्रण ठेवले. मात्र, यूपीए २ च्या काळात झालेल्या घोटाळ्यांनी कॉंग्रेसने देशाला दिलेल्या माहिती हक्क कायदा, नरेगा, शिक्षण हक्क कायदा अशा चांगल्या गोष्टी धुळीला मिळाल्या आणि अवतरलेल्या मोदी लाटेत कॉंग्रेसचा देशभरात धुव्वा उडाला. ही स्थिती अजूनही बदललेली नाही. गोव्यातील गेल्या निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला कौल दिला तरी त्या यशाचा फायदा उठवणे पक्षाला जमले नाही. नुकत्याच पंजाबमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार भरघोस मतांनी जिंकला असला, तरीही पक्षाने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करून देणारे नेतृत्व जोवर मिळत नाही, तोवर पक्ष वर उसळी घेणे कठीण आहे. पक्षाला सक्षम नेतृत्व देण्याचे हेच आव्हान राहुल यांच्यासमोर असणार आहे. विद्यमान सरकारने कितीही हवाबाजी चालवली असली, तरी सारे काही आलबेल दिसत नाही. जनतेमध्ये नाराजी हळूहळू मूळ धरू लागली आहे. त्यासंबंधी सरकारकडून वेळीच योग्य पावले उचलली गेली नाहीत, तर जनता पर्याय शोधू लागेल. हा पर्याय कोण देणार हाच या घडीस प्रश्न आहे. महाआघाडीच्या वल्गना प्रादेशिक नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांना पंख फुटल्याने एव्हाना हवेत विरल्या आहेत. नव्याने आवळ्या – भोपळ्याची मोट बांधायची म्हटली तरी त्यातल्या त्यात संपूर्ण देशामध्ये स्वीकारार्हता असलेला राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्ष म्हणजे कॉंग्रेसच आहे. त्यामुळे जबाबदारी कॉंग्रेस नेतृत्वाच्या शिरावर येणार आहे. राहुल गांधी हे आव्हान पेलू शकतील का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराची जबाबदारी पेललेल्या केंब्रिज ऍनालिटिक्स कडे भले पक्षाने प्रचार रणनीती आखण्याची जबाबदारी दिली, तरी जनसामान्यांशी तुटलेली पक्षाची नाळ पुन्हा जुळवण्यात त्यांना यश येणार का? आपली पारंपरिक मतपेढी पुन्हा जवळ करण्यास राहुल यांच्याजवळील गांधी घराण्याचा करिष्मा कामी येणार का? प्रश्नच प्रश्न आहेत आणि अद्याप अनुत्तरित आहेत. आजवरची त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यांची प्रतिमाच त्यांची वैरी बनलेली आहे. मध्यंतरी ते दीर्घकाळ अज्ञातवासात गेले. त्यानंतर परतलेले राहुल बदलल्याची चर्चा रंगू लागली, परंतु या बदलाचे दृश्य परिणाम अद्याप तरी दिसून आलेले नाहीत. गांधी घराण्याचे वारस असल्याने पक्षावर पकड ठेवणे त्यांना कठीण जाणार नाही, परंतु राखेमधून पुन्हा उभारी घेणार्या फिनिक्ससारखे कॉंग्रेसला सध्याच्या धुळधाणीतून पुन्हा वर काढण्याचे बळ त्यांच्या बाहूंत खरेच आहे काय? येणार्या काही राज्यांच्या निवडणुका ही राहुल यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे!