आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी २५ मी. पिस्तोल प्रकारात राही सरनौबत हिने सुवर्ण लक्ष्य साधले. प्रिसिजन प्रकारात मनू भाकर २९७ गुण घेत पहिल्या स्थानी होती.
या प्रकारात राही हिला २८८ गुणांसह सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होेते. यानंतरच्या रॅपिड प्रकारात ५९३ गुण घेत मनू हिने पहिल्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. पात्र ठरलेल्या आठ खेळाडूंमध्ये राहीने ५८० गुण घेत सातव्या स्थानासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यावेळी मनू हिलाच पदकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.
अंतिम फेरीत मात्र राहीने सुरुवातीपासून सर्वोत्तम खेळ करत आपले अव्वल स्थान कायम राखले. मात्र अंतिमच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत संयुक्त पहिले स्थान मिळवले. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे समान ३४ गुण झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसर्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
राहीचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. २०१४ मध्ये याच क्रीडा प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले होते.