>> पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनेला मदत
>> सुरक्षा यंत्रणांकडे सबळ पुरावे
जम्मू काश्मीरात रासायनिक शस्त्रांद्वारे दहशतवादी हल्ला घडवून आणून भारतात खळबळ माजविण्याचा कट शिजत असून त्यासाठी हिजबूल मुजाहिद्दीन या कुख्यात दहशतवादी संघटनेला पाकिस्तान रासायनिक शस्त्रे पुरवणार असल्याची ध्वनिफीत सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे. एका वृत्त वाहिनीने या कटाचा भांडाफोड केला असून या सबळ पुराव्यामुळे पाकिस्तान दहशतवादी संघटनांना भारतात हल्ले करण्यास पाठबळ देत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत लष्कराने दहशतवादी हल्ले परतवून लावताना सुमारे ९० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी करून भारतीय लष्कराला धडा शिकवण्यासाठी रासायनिक हल्ला काळजात धडकी भरणारा ठरणार असल्याचे दहशतवादी संघटनेचे मत बनले आहे. त्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना रासायनिक शस्त्रांचा पुरवठा करण्याबरोबरच प्रशिक्षणही देत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हिजबुल या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांकडे रासायनिक शस्त्रे पोचली आहेत. या रासायनिक शस्त्रांचा भारतीय लष्कराविरुद्ध वापर करण्यासाठी दहशतवादी उताविळ झाले आहेत. भारतीय जवानांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या योजना आखल्या जात असल्याचे ध्वनिफितीद्वारे समोर आले आहे.
‘‘पिर साहेब (लष्कर ए तोयबाचे प्रमुख हाफीज सय्यद) यांना लष्कराला धडा शिकवायचा आहे. ईदनंतर आम्ही धडा शिकवू… आम्ही ईदनंतर दुसर्या हल्ल्याची तयारी करू’’ असे हिजबूलचा म्होरक्या बोलत असल्याचे सुरक्षा यंत्रणांना सापडलेल्या ध्वनिफीतीत स्पष्ट ऐकू येत आहे.
आतापर्यंत आम्ही पारंपरिक शस्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र, पुढील हल्ला भारतीय सुरक्षा दलांना आश्चर्यकारक वाटणारा असेल. ‘‘इंशाअल्ला, आम्हांला प्रचंड प्रमाणात पाकिस्तानकडून पाठिंबा मिळणार आहे… सीमा रेषेवर सर्वकाही अपेक्षेनुसार घडत आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तान भारताविरुद्ध गेम पक्की करेल,’’ असे संभाषण हिजबुलच्या म्होरक्याचे दुसर्या बाजूने ध्वनिफीतीत टिपले गेले आहे.
हिजबूल मुजाहिद्दीन जम्मू काश्मीरात हल्ले घडवून आणणारी मोठी दहशतवादी संघटना आहे. या संघटनेचे सुमारे २०० सक्रिय दहशतवादी सदस्य आहेत. दोन दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूना घेऊन जाणार्या बसवर हल्ला करून ७ यात्रेकरूंना ठार करण्यात या संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, रासायनिक हल्ल्याविषयी बोलताना भाजप नेते आर. के. सिंह यांनी तसा हल्ला करण्यापूर्वी हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेने विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसे झाल्यास शत्रूंना धडा शिकवण्यासाठी युद्ध अटळ असल्याचे ते म्हणाले.
‘‘आतापर्यंत आम्ही भारतीय सेनेविरुद्ध ग्रेनेड वापरले. त्यात केवळ तीन-चार जवान मारले गेले. मात्र, यावेळी आम्ही व्यूहरचना बदलली आहे. आम्ही सरळ रासायनिक शस्त्रे वापरून एकाच वेळी मोठ्या संख्येने भारतीय सैनिकांना ठार करणार.’’
– हिजबुल संघटनेचा म्होरक्या