>> शिक्षण सचिवांची माहिती; पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रमासाठी समितीची स्थापना; पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी सक्तीची
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये पायाभूत स्तरापासून (फाउंडेशन लेव्हल) सुरू करण्यात येणार असून, पायाभूत स्तरावरील शाळा येत्या 3 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत. पायाभूत स्तर-1 मध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाची 3 वर्षे आणि पहिली व दुसरीचा समावेश असून, वयाची तीन वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. पायाभूत स्तरावर मुलांना आनंददायी अभ्यासक्रम म्हणजेच कृती, खेळ आदींच्या माध्यमातून शिकविण्यात येणार आहे. तसेच राज्याचा पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ प्रा. अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडून हा अभ्यासक्रम येत्या 6 महिन्यांत तयार केला जाणार असून, त्यात गोव्याचा निसर्ग व गोमंतकीय संस्कृतीचा समावेश असणार आहे. याशिवाय पायाभूत स्तरावरील पूर्वप्राथमिक विद्यालयांसाठी नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी शिक्षण संचालनालयाच्या सभागृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत स्तरामधील 5 वर्षांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाची 3 वर्षे आणि पहिली व दुसरीचा समावेश आहे.
यावर्षी पायाभूत स्तर-1 मध्ये 3 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
राज्य सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विविध स्तरावर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणार आहे. पायाभूत स्तरावर मुलांना शिकविण्यासाठी पुस्तकाचा वापर केला जाणार नाही. मुलांना आनंददायी वातावरणात खेळ, कृती माध्यमातून शिकविले जाणार आहे. या स्तरावर मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासावर भर दिला जाणार आहे. या स्तरावर मुलांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. तथापि, मुलांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यांकन केले जाणार आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले.
पुस्तकरूपी अभ्यासक्रम नाही;
‘मास्टर ट्रेनर’कडून प्रशिक्षण
या स्तरावरील मुलांसाठी पुस्तकरूपी अभ्यासक्रम नसला तरी, शिक्षकांना मुलांना शिकविण्याबाबत मागदर्शन करण्यासाठी पुस्तके तयार करण्यात आलेली आहेत. तसेच शिक्षण खात्याकडून पायाभूत स्तरावरील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पायाभूत स्तरावरील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. या मास्टर ट्रेनरकडून पायाभूत स्तरावरील इतर शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पायाभूत स्तरावरील मुलांच्या बौद्धिक विकासाचा आढावा घेऊन शिक्षकांना आवश्यक प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले.
31 मेपासून पूर्णपणे अंमलबजावणी;
शाळांना नोंदणीसाठी 15 जूनपर्यंत मुदत
राष्ट्रीय शिक्षण धोरण पायाभूत स्तरावर पूर्णपणे लागू करण्यासाठी 31 मे 2025 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पायाभूत स्तरावरील शिक्षण संस्थांसाठी नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. येत्या 15 जूनपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे, असे लोलयेकर
म्हणाले.
सक्तीच्या नोंदणीअभावी पूर्व प्राथमिक
शाळांचा नेमका आकडा सांगणे कठीण
पायाभूत स्तरावरील शिक्षण संस्थांसाठी आवश्यक साधन सुविधा, प्रशिक्षित शिक्षक वर्ग आदी अटी घालण्यात आल्या आहेत. पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण खात्याकडे नोंदणी नसलेल्या पायाभूत स्तरावरील विद्यालयाला 31 मे 2025 नंतर परवानगी दिली जाणार नाही. सध्या पूर्व प्राथमिक स्तरावर नोंदणी सक्तीची नसल्याने राज्यातील पूर्व प्राथमिक स्तरावरील शाळांचा निश्चितपणे आकडा सांगता येत नाही, असेही लोलयेकर यांनी सांगितले.
राज्यात पूर्व प्राथमिक शिक्षण
देणाऱ्या 3 हजार शाळा कार्यरत
राज्यात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सुमारे तीन हजार शाळा कार्यरत आहेत. त्यात सरकारच्या अंगणवाडी, बालवाडी, पूर्व प्राथमिक शाळांचा सुध्दा समावेश आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी प्राथमिक शाळांना नोंदणी करावी लागणार आहे. सरकारच्या अंगणवाडी, बालवाडी आणि पूर्ण प्राथमिक शाळांची नोंदणी करून घेतली जाणार आहे, असेही लोलयेकर यांनी
सांगितले.
सहा महिन्यांत अभ्यासक्रम तयार : लोलयेकर
पायाभूत स्तरावर राज्याचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्रा. अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली समिती येत्या सहा महिन्यात अभ्यासक्रम तयार करणार आहे. राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये गोव्यातील सण, उत्सव, परंपरा, निसर्ग, शेती, संस्कृती आदींचा समावेश केला जाणार आहे, असेही शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
खास शिक्षक तयार करणार
राज्यात पायाभूत स्तरावर शिक्षण देणारे खास शिक्षक तयार करण्यासाठी खास अभ्यासक्रम तयार केला जात आहे. तूर्त पूर्व प्राथमिक, अंगणवाडीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना पायाभूत स्तरावर शिकविण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.