राष्ट्रीय शिक्षण धोरण : 80 शिक्षकांन बंगळुरूमध्ये प्रशिक्षण देणार

0
13

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलबजावणीच्या गोंधळावर तोडगा काढण्यात आला असून, शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात विज्ञान आणि गणित विषयाच्या 80 शिक्षकांना येत्या 18 जूनला बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.

राज्य सरकारने माध्यमिक स्तरावर इयत्ता नववीच्या वर्गाला एनईपी 2020 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एनईपी लागू केला जात आहे. राज्यभरात राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर जागृती बैठका घेण्यात येत आहेत. एनईपी अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडीअडचणींवर तोडगा काढला जात आहे. पालक, विद्यालय व्यवस्थापन यांच्या शंका दूर करण्यात येत आहेत, असेही झिंगडे यांनी सांगितले. यावेळी कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, नियोजन, सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवार दि. 15 जून रोजी सकाळी 10 वाजता स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाखाली शिक्षण आणि शेती या विषयावर स्वयंपूर्ण मित्र, ग्रामपंचायत सदस्य, विभागीय कृषी अधिकारी आणि नागरिकांशी आभासी पद्धतीने संवाद साधणार आहेत, अशी विजय सक्सेना यांनी दिली.
निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्वयंपूर्ण गोवा उपक्रम स्थगित ठेवला होता. आता, पुन्हा एकदा या उपक्रमाला सुरुवात केली आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.

क्रीडा, वेल बिईंग विषय आता बंद
राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून इयत्ता नववीच्या वर्गाला लागू करण्यात आल्याने नववीच्या वर्गासाठी क्रीडा आणि वेल बिईंग हा सातवा विषय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, दहावीच्या वर्गासाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा आणि वेल बिईंग हा सातवा विषय कायम ठेवण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक यांनी काल जारी केले. शिक्षण संस्थांनी नववीच्या वर्गाला हा विषय लागू करण्यासाठी कोणतेही प्रस्ताव पाठवू नयेत, अशी सूचना करण्यात आली आहे.