राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

0
9

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी भरदिवसा 3 हल्लेखोरांनी गोगामेडींवर गोळीबार केला. त्यानंतर ते पळून गेले. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. गँगस्टर रोहित गोदाराने हत्येची जबाबदारी घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. गोगामेडी यांच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेले सुरक्षारक्षक अजित सिंग हे गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अन्य एका तरुणाचाही हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी यांचे घर श्यामनगर जनपथवर आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तीन हल्लेखोर त्यांच्या घरी पोहोचले. आधी ते सोफ्यावर बसले आणि गोगामेडींशी बोलू लागले. सुमारे 10 मिनिटांनंतर दोन हल्लेखोर उठले आणि त्यांनी अचानक गोळीबार केला. गोळीबार सुरू असताना गोगामेडींच्या सुरक्षारक्षकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला. तेथून निघताना एका आरोपीने गोगामेडी यांच्या डोक्यात गोळी झाडली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात अन्य एका तरुणालाही गोळी लागली आणि त्याचाही मृत्यू झाला.

गोळीबारानंतर दोन हल्लेखोर धावत रस्त्यावर आले आणि त्यांनी कार थांबवून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चालकाला पिस्तूल दाखवताच चालकाने गाडी दामटली. यादरम्यान मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. त्याला गोळ्या घालत जखमी करून दुचाकीवरून हल्लेखोरांनी पळ काढला.