राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या मशाल फेरीचे उद्घाटन

0
23

>> राज्यातील 12 तालुक्यांतून करणार प्रवास; प्रमुख पर्यटन स्थळांना देणार भेट

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या ऐतिहासिक मशाल फेरीचे उद्घाटन काल पर्वरी येथील सचिवालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेच्या सर्वोत्तम आयोजनासाठी गोवा पूर्णपणे तयार आहे. या स्पर्धेसाठीची मशाल फेरी आपल्या सुंदर राज्यातील सर्व 12 तालुक्यांतून प्रवास करेल आणि सर्व प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देत राष्ट्रीय खेळांचा उत्साह वाढवेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासह क्रीडा सचिव आणि एनजीओसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचन, कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर, क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालयाचे अरविंद खुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी, गोवा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेत 43 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये अनेक नवीन खेळांचे पदार्पण होणार आहे. त्यात बीच फुटबॉल, रोलबॉल, गोल्फ, सेपॅकटॅकरो, स्काय मार्शल आर्ट्स, कलारिपायट्टू आणि पेनकॅक सिलाट या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. शिवाय, नौकानयन आणि तायक्वांदो हे खेळ मागील आवृत्तीत नव्हते. मात्र यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहेत. परंपरा आणि संस्कृतीला मान्यता देत लगोरी आणि गटका या खेळांचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे कार्यक्रमाला एक अनोखा आयाम जोडला गेला आहे.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातून मशाल फेरी सुरू झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. ही ऐतिहासिक मशाल फेरी खिलाडूवृत्तीच्या चिरंतन ज्योतीचे प्रतीक असून, क्रीडापटूंच्या उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेला मूर्त रूप देते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचेही भाषण झाले. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकडे आम्ही केवळ एक कार्यक्रम म्हणून पाहत नाही, तर राज्यासाठी नवसंजीवनी म्हणून पाहत आहोत. सध्याच्या आवृत्तीत विक्रमी संख्येने क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, ही आवृत्ती देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी राष्ट्रीय खेळ असेल. या खेळांमुळे गोव्यातील ऑलिम्पिक खेळांबाबत अधिक आवड निर्माण होईल, असे गावडे म्हणाले.
यंदाच्या राष्ट्रीय क्रीय स्पर्धेत 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 10,000 खेळाडू आणि 2,000 अधिकारी सहभागी होतील. विशेष म्हणजे, पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल. दरम्यान, उद्घाटनाच्या अगोदर 7 दिवस आधी बॅडमिंटन स्पर्धांनी स्पर्धेला सुरुवात होईल.