राष्ट्रीय एकात्मता दिवस

0
417
  • प्रा. नागेश एस. सरदेसाई
    (वास्को)

सरदार पटेलांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा आणि ‘नवा भारत’ घडवून आणावा, अशी अपेक्षा तरुण मंडळींकडून देशाला आहे. सरदार पटेल यांचा चौफेर दृष्टिकोन, बारकाईने निरीक्षण करणे इ. गुण अंगिकारणे हे ३१ ऑक्टोबरच्या राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या अनुषंगाने अभिप्रेत आहे.

भारतात गेल्या अनेक शतकात वेगवेगळे थोर पुरुष होऊन गेलेत. खरं तर भारत भूमी ही पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते ती याचमुळे. या देशाला शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. असेच एक थोर पुरुष ज्यांना ‘लोह पुरुष’ म्हणून ओळखले जाते, ते वल्लभभाई उर्फ सरदार पटेल, गुजरातच्या भूमीत ज्यांचा जन्म झाला. ३१ ऑक्टोबर १८७५ या दिवशी त्यांचा जन्म करमसद या गावी खेडा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील झवेरभाई भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले होते. त्यांनी झॉंशीच्या राणी लक्ष्मीबाईसमवेत काम केले होते. त्यांची माता लाडबाबाई एक राष्ट्रभक्त होती. वल्लभभाई आणि त्यांचे थोरले बंधू विठ्ठलभाई गावाजवळच्या शाळेत शिकले. तेथे त्यांना नीतीमुल्ये आणि गुणात्मक शिक्षण प्राप्त झाले. संस्कृतच्या शिक्षकांवर त्यांचा फार प्रभाव पडला होता. ते शिक्षक त्यांना रामायण व महाभारतातले अंश सांगायचे. त्यामुळेच त्यांना आत्मनिरीक्षण आणि नेतेपदाचे ज्ञान प्राप्त झाले. तत्कालीन काळाला अनुसरून त्यांचा विवाह लहान वयातच करून देण्यात आला. त्यांना दयाभाई आणि मणिबेन अशी दोन अपत्ये झालीत. त्यांच्या पत्नीचा अल्पशा आजारानंतर मृत्यु झाल्यावर वल्लभभाई इंग्लंडमध्ये वकीलीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. त्यांचा तिथेही प्रभाव पडून बॅरीस्टर होऊन ते भारतात परतले व येथे त्यांनी वकीली सुरू केली. तो काळ भारताच्या पारतंत्र्याचा काळ असल्याने त्यांना त्यात फारसा रस वाटत नव्हता. अहमदाबाद शहरातल्या गुजरात क्लबचे सदस्यत्व घेऊन त्यांनी तिथे गांधीजींच्या व्याख्यानांचा आस्वाद घेतला. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या व्याख्यानाने प्रभावित होऊन त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेण्याचा निश्‍चय केला. खेडा शेतकर्‍यांच्या संघर्षामध्ये सम्मिलित होऊन त्यांनी लढ्यात पहिलं पाऊल टाकलं आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यात ते गांधीजींच्या मंत्राच्या साहाय्याने यशस्वी झाले. खादी वस्त्र, विदेशी वस्तूंचा त्याग अशी भूमिका त्यांनी घेतली. लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर स्वातंत्र्याची धुरा गांधीजींनी आपल्या हातात घेतली. १९२०च्या दशकात असमर्थन लढ्यात त्यांनी मोठा वाटा उचलला होता. १९२३ साली आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली जो झेंडा सत्याग्रह झाला त्यात पटेल आघाडीवर होते. त्यानंतर १९२८ मध्ये ‘बारडोली’च्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. सूरत जिल्ह्यातल्या बारडोली गावात सरकारच्या अमानवीय महसूल वाढविण्याच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला आणि ते विजयी झाले. त्या दिवसापासून त्यांना ‘बारडोलीचा सरदार’ म्हणून ओळखले जाई. १९३० च्या दांडी मार्चच्या संदर्भात लोकांना जागृत करण्यासाठी विविध ठिकाणी त्यांनी सभा घडवून आणल्या आणि त्यांचे नेतृत्वही केले. यामुळे सरदारांचे नेतृत्व कौशल्य जगासमोर आले.

१९३१ मध्ये कराची अधिवेशनात त्यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. विशेष म्हणजे या अधिवेशनात गांधीजींना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या फाशीसंदर्भात काहीही स्पष्टीकरण न दिल्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांचा आक्रोश पहायला मिळाला, पण सरदारांनी ठोस भूमिका घेऊन त्या प्रसंगाला सांभाळून घेतले.

१९३७ साली ब्रिटीश सरकारने भारताच्या जनतेला आपले प्रतिनिधी निवडून देण्याची संधी प्राप्त करून दिल्यावर कॉंग्रेसच्या प्रचार लढ्यात त्यांनी भूमिका बजावली. त्यात त्यांना यश मिळाले व बर्‍याच प्रांतांमध्ये कॉंग्रेसचे प्रतिनिधी निवडून आले. दुसर्‍या महायुद्धाच्या सावटाखाली अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या वतीने सत्याग्रह घडवून आणला. सरदार त्यात पहिले सत्याग्रही होते. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटनची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने भारतासारख्या विशाल वसाहती सांभाळणे कठीण होऊ लागले होते. त्याच दिशेने जेव्हा गांधीजींनी ‘भारत छोडो’चा नारा दिला तेव्हा सरदारांची भूमिका मोठी होती. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानापासून ही गर्जना सुरू होऊन संपूर्ण देशाने ती ऐकली. सर्व स्वातंत्र्यसेनानींना तुरुंगात टाकण्यात आले. सरदार पटेलांना अहमदाबादच्या तुरुंगात ठेवण्यात आले. दुसर्‍या विश्‍व युद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटन भारताला स्वातंत्र्य देण्यास उत्सुक होता. त्या दिशेने ‘कॅबिनेट मिशन’ १९४६ साली भारतात आलं. त्यात त्यांना फारसं यश संपादन झालं नाही. महम्मद अली जिनांच्या दोन देश पॉलिसीवर ठाम राहिल्यामुळे गांधीजींना फार व्यथा सोसाव्या लागल्या. देशात नागरी युद्धाचं सावट दिसायला लागल्यावर गांधीजींनी दोन राष्ट्राचा विकल्प मान्य करून पाकिस्तान हा मुस्लीम संप्रदायाला देण्याचे मान्य केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी भारतामध्ये जवळजवळ ५५०च्या वर राजवाडे प्रांत अस्तित्वात होते. त्यांना एकसंघ आणणे ही काळाची गरज होती. त्या राजवाड्यांच्या राज्जांना एकसंघ आणून त्यांना भारत राष्ट्राच्या अखत्यारित आणण्याची भूमिका सरदार पटेलांनी बजावली होती. त्याबद्दल त्यांचा गौरवही झाला. भारताचे उपप्रधानमंत्री तसेच गृहमंत्री या अनुषंगाने त्यांनी सिंहाची भूमिका घेत देशबांधणीच्या भूमिकेत अपार यश संपादन केले. त्यांच्यामध्ये अशा प्रकारे एक थोर राष्ट्रभक्त, विचारवंत आणि नेता दडलेला होता. हैदराबाद वगळता त्यांना सर्व राज्यांनी भारताच्या सार्वभोमत्वावर विश्‍वास दाखवला. सरदार पटेलांचा स्वतंत्र भारताच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा होता. त्यांनी ठोेस आणि पारदर्शक प्रशासनासाठी केंद्र व राज्य सरकारमध्ये समता घडवून आणण्यासाठी दोन अखिल भारतीय सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवा निर्माण केल्या. याव्यतिरिक्त त्यांनी वेगवेगळ्या केंद्रीय सेवांचे जाळे विणले पण काळाने त्यांना आमच्यापासून दूर केले. आणि डिसेंबर १९५० मध्ये त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या या अनमोल कार्याबद्दल त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘‘भारत रत्न’’ मरणोपरांत १९९० साली देण्यात आला. त्यांच्या स्मृतीला वंदन करून दरवर्षी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर हा आठवडा सतर्कता आठवडा म्हणून राष्ट्रभर पाळण्यात येतो.

भारतीय नौसेनेचा गुजरातमधील तट त्यांच्या नावावर असून ‘आय्. एन्.एस्. सरदार’ असे त्याचे नामांकन करण्यात आले आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमी आता ‘सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी’ म्हणून ओळखली जाते. त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी, तसेच भारताच्या आदर्श एकात्मतेच्या सन्मानार्थ ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे. विश्‍वातील सर्वात उंचीचे स्मारक म्हणून त्याची नोंद झाली आहे.

सरदार पटेलांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा आणि ‘नवा भारत’ घडवून आणावा, अशी अपेक्षा तरुण मंडळींकडून देशाला आहे. सरदार पटेल यांचा चौफेर दृष्टिकोन, बारकाईने निरीक्षण करणे इ. गुण अंगिकारणे हे ३१ ऑक्टोबरच्या राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या अनुषंगाने अभिप्रेत आहे. त्याशिवाय ३१ ऑक्टोबर हा दिवस स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांचा बलिदान दिवस होय. अशा या दोन आगळ्यावेगळ्या शिल्पकारांना वेगळ्या पद्धतीने नमन करून एक प्रतिज्ञा घेऊन भारताला एक महान देश बनविणे हे आजच्या दिवसाचे ब्रीद वाक्य आहे.