राष्ट्रपुरूष

0
142

विशेष संपादकीय

तू दबे पॉंव, चोरी छिपे न आ
सामने वार कर ङ्गिर मुझे आजमा…
साक्षात् मृत्यूला या शब्दांत ललकारत या देशाचा एक महान नेता दिगंतराला निघून गेला आहे. भारत देश अटलबिहारी वाजपेयी नावाच्या एका महान सुपुत्राला मुकला आहे. या देशाचे कोट्यवधी नागरिक या क्षणी जे अश्रू ढाळीत आहेत, त्यातच या व्यक्तिमत्त्वाची महत्ता सामावलेली आहे. आपल्या सुपुत्राच्या वियोगाने जणू अवघी भारतमाताच आज अश्रू ढाळते आहे. एक अत्यंत सुसंस्कृत, निःस्वार्थी, चारित्र्यवान नेता, एक संवेदनशील भावकवी, एक ओजस्वी, संस्मरणीय वक्ता, एक चालते बोलते वात्सल्य… किती रूपे, किती छटा… काय काय आठवायचे, किती आठवायचे! निर्नायकी अवस्था बनलेल्या या देशाला एक सक्षम असे नेतृत्व अटलजींनी दिलेच, परंतु त्याचबरोबर राजकारणासारख्या गढूळलेल्या क्षेत्रात राहूनही स्वच्छ राहता येते हा आदर्शही नव्या पिढीला दिला. ‘हे प्रभू, मुझे इतनी उँचाई कभी मत देना, गैरोंको गले न लगा सकूँ, इतनी रुखाई कभी मत देना’ या केवळ कवितेच्या ओळी नव्हेत. ते एक जगणे होते. जीवन आणि कवित्व एकरूप झालेला असा कवी नसेल; उक्ती आणि कृती एकजीव झालेला असा वक्ता नसेल. विसंगती असेल तर ती ङ्गक्त नावात, कारण ‘अटल’ म्हणजे न ढळणारा, तर ‘बिहारी’ म्हणजे विहारी… सदैव विहार करणारा. आपण राजकारणात ‘अटल’ आहोत आणि साहित्यात ‘विहारी’ असे ते गंमतीने म्हणत. अवघे आयुष्य या ब्रह्मचार्‍याने जणू आपल्या प्रिय देशालाच देऊन टाकले. हिंदुत्वाच्या विचारधारेच्या धगधगत्या पथावरून वाटचाल करीत असतानादेखील स्वतःचा विवेक ढळू दिला नाही. संकुचितपणाची झापडे डोळ्यांवर ओढून घेतली नाहीत. प्रसंगी स्वकियांना राजधर्माचे स्मरण करून द्यायला देखील त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. वाजपेयींचे वेगळेपण होते ते हे होते. त्यांचा हा उदारमतवाद, विवेक यामुळे ते सर्व विचारधारांशी संवाद साधू शकले. त्यांच्या सरकारमध्ये दक्षिणेच्या जयललितांपासून उत्तरेच्या फारुख अब्दुल्लांपर्यंत आणि बंगालमधील ममतांपासून महाराष्ट्राच्या बाळासाहेब ठाकरेंपर्यंत भिन्न भिन्न प्रकृतीचे नेते आणि त्यांचे पक्ष यांना ते सोबत घेऊ शकले. हे सोपे नव्हते आणि ज्या काळामध्ये वाजपेयी हे करू शकले त्या काळामधील भाजपाची मर्यादित शक्ती लक्षात घेता तर मुळीच सोपे नव्हते. हा अटलबिहारी वाजपेयी या सच्च्या व्यक्तीने घडविलेला चमत्कार होता. दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, श्यामाप्रसाद मुखर्जी अशा तपस्वी कार्यकर्त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांनी सामाजिक कार्याचा विडा उचललेला होता. दीनदयाळांचा एकात्म मानवतावाद त्यांनी नुसता उक्तीत नव्हे, तर कृतीत उतरवला होता. त्यामुळे आज त्यांना कायमचा निरोप देताना सर्वपक्षीयांमध्ये, सर्व विचारधारांच्या माणसांच्या उरामध्ये देश एका चांगल्या माणसाला मुकतो आहे याचे पराकोटीचे दुःख आहे. ‘परहित अर्पित अपना तन मन’ म्हणत राजकारणाच्या कर्दमात कमळ ङ्गुलवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले, पण त्या चिखलाचा स्पर्श स्वतःला होणार नाही हेही कसोशीने पाहिले. एवढा दीर्घ काळ राजकारणात राहूनही ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिंमत विरोधकांना झाली नाही असे लखलखीत चारित्र्य असल्यावर डर असेल तरी कशाची? अटलजींच्या वैयक्तिक आयुष्यालाही एक पारदर्शी रूप होते. एका कठीण कालखंडात त्यांनी या देशाला नेतृत्व दिले. नव्हे, नेतृत्व कसे असते याचा वस्तुपाठ दिला. पोखरणच्या अणुचाचण्या घडवून या देशाचा स्वाभिमान जागवला. वैराच्या आगीत जळत राहण्यापेक्षा पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढे करून ते मिटविण्याची प्रामाणिकपणे संधी दिली, ती न घेण्याचा करंटेपणा मुशर्रङ्ग यांनी तेव्हा दाखवला हा भाग वेगळा, परंतु आप्तांचा विरोध असतानाही हे पाऊल उचलायलाही हिंमत लागते. अटलजींनी आपल्या अल्प सत्ताकाळामध्ये देशामध्ये जी क्रांतिकारी पावले उचलली ती दुर्लक्षिता येणारी नाहीत. आसेतू हिमाचल पसरलेल्या या विराट देशाला जोडणारी सुवर्ण चतुष्कोण महायोजना अटलजींच्या सरकारने चालीला लावली होती. देशाला महासंगणक त्यांनीच मिळवून दिला. पोखरणच्या अणुचाचण्यांद्वारे देशाचा स्वाभिमान जागविणारे पाऊल त्यांनीच हिंमतीने टाकले होते. अग्निपरीक्षेच्या वेळीही ‘न दैन्यं, न पलायनम्’ असे सांगणार्‍या अर्जुनाप्रमाणे आव्हानांशी लढत लढत सामोरे जायचे असते, अशी विजिगीषू वृत्ती असलेल्या अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात या देशाची चिंता सदैव वाहत आलेला एक विचारवंतही सामावलेला होता. इतरांनी लिहून दिलेली भाषणे वाचण्याची त्यामुळे त्यांना कधी गरज भासली नाही. खरोखरीच दशसहस्त्रेशु असा हा अमोघ वक्ता होता. देवी शारदा तर जिव्हेवर वसलेली. संसदेत आणि संसदेबाहेर वाजपेयींची वाग्वैजयंती दौडत राहिली. त्यांची भाषणे ज्यांनी ऐकली, त्यांच्या कानांत आज ते शब्द गुंजत असतील. डोळे मिटत, दीर्घ विराम घेत बोलण्याची त्यांची ढब चेष्टेचा विषय ठरली, परंतु त्या विरामानंतर ओठांतून येणारे साधे शब्दही कशी वज्राची ताकद घेऊन येत तो केवळ अनुभवण्याचाच विषय होता. त्यांच्यातल्या भावकवीचे दर्शन तर ह्रदयस्पर्शी होते. त्या कवितांचे संग्रह आले. काहींची गीतेही बनली. त्यांना सुमधुर चाली लावून ती गायिलीही गेली, परंतु ही नुसती गीते नव्हेत, ती जणू एका कर्मयोग्याची गीता आहे. ते शब्द ते जगत आले होते. समर्थांनी ‘श्रीमंत योगी’ असे शिवाजीराजांना उद्देशून म्हटले होते. अटलबिहारी वाजपेयी हेही एक श्रीमंत योगीच होते. धनाने नसेल, परंतु मनाने, विचारांनी श्रीमंत असा योगी. कर्मयोगी. सत्तेच्या नश्वरतेचे भान असलेला, सत्ता हे स्वार्थ साधण्याचे नव्हे, तर समाजहिताचे साधन आहे याची जाणीव जोपासणारा, या देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न पाहणारा. नुसते स्वप्न न पाहता ते साकारण्यासाठी आपल्या अवघ्या आयुष्याची या राष्ट्रयज्ञात आहूती देणारा…
या अग्रलेखाचा प्रारंभ ज्या ओळींनी केला, अटलजींच्या त्या कवितेच्या पुढच्या ओळी अशा आहेत –
मौतसे बेखबर, जिंदगीका सङ्गर
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर
बात ऐसी नही की कोई गमही नही
दर्द अपने – पराए कुछ कम भी नही
प्यार इतना परायोंसे मुझको मिला
न अपनोंसे बाकी है कोई गिला,
हर चुनौतीसे दो हाथ मैने किए
आँधियोंमे जलाए है बुझते दिये….
… या आहुतीतून केवळ राख मागे उरणार नाही. मागे राहणार आहे राष्ट्रसमर्पित जीवनाचा एक आदर्श. त्यापासून प्रेरणा घेऊन या देशाच्या नव्या पिढ्या घडतील आणि देश घडवतील अशी आशा करूया.