राष्ट्रपती आज गोव्यात

0
8

>> तीन दिवसांचा दौरा; आजपासून विविध कार्यक्रमांत होणार सहभागी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवार दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आगमन होणार आहे. 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान त्यांचे गोव्यात वास्तव्य असेल. देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू प्रथमच गोवा भेटीवर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. तीन दिवसीय गोवा दौऱ्यात त्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ नागरी सत्कार समारंभ 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 वाजता राजभवनातील दरबार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी, संध्याकाळी 4.45 वाजता पणजी येथील आझाद मैदानाला भेट देऊन त्या हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतील. दोनापावला येथे आयोजित राष्ट्रपतींच्या नागरी सत्कार समारंभात उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांनी बांबोळी, गोवा विद्यापीठ, ताळगाव या रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता गोवा विधानसभेत आयोजित खास समारंभात लोकप्रतिनिधींना संबोधित करणार आहेत. दि. 24 रोजी त्या आग्वाद किल्ला, जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बॉम जिझस चर्च व शांतादुर्गा मंदिराला भेट देतील. नंतर त्यांचे दिल्लीकडे प्रयाण होईल.

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

  • राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त राज्यातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत, असे वाहतूक पोलीस विभागाने कळविले आहे.
  • दि. 22 ऑगस्ट रोजी, राष्ट्रीय महामार्ग (एनएच) 566 दाबोळी विमानतळ ते वेर्णा, एनएच 66 वेर्णा ते बांबोळी, जीएमसी ते दोनापावला, दोनापावला ते मिरामार सर्कल ते बांदोडकर पुतळा हे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • दि. 23 ऑगस्ट रोजी राजभवन ते बांबोळी, एनएच 66 बांबोळी ते पर्वरी आणि अटल सेतू हा रस्ता बंद केला जाणार आहे.
  • दि. 24 ऑगस्ट रोजी राजभवन ते बांबोळी हा रस्ता, एनएच 66 बांबोळी ते मेरशी जंक्शन ते जीव्हीएम सर्कल फोंडा, एनएच 566 जीव्हीएम सर्कल ते बोरी पूल, बोरी पूल ते आयडीसी वेर्णा आणि एनएच 566 आयडीसी वेर्णा ते दाबोळी विमानतळ असा रस्ता बंद असेल.