>> २९ जूनपर्यंत नामांकन अर्जांसाठी मुदत; २१ जुलैला निकाल
निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तारीख जाहीर केली आहे. १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होईल. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. इच्छुक उमेदवारांना २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला आव्हान देऊ शकेल इतपत एकजूट विरोधकांमध्ये आहे की नाही, याचा फैसला या निवडणुकीच्या निमित्ताने होईल.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई असलेले पेन देण्यात येईल. मतदान करताना लोकप्रतिनिधींना १,२,३ असा पसंतीक्रम ठरवता येईल. पहिली पसंती न सांगितल्यास मत रद्द ठरवले जाईल.
या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होईल. राज्यसभेचे महासचिव निवडणूक प्रभारी असतील.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. गेल्या वेळी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक १७ जुलै २०१७ रोजी झाली होती.
राष्ट्रपती पदावर उत्तर भारतीय, तर उपराष्ट्रपतीपदावर दक्षिण भारतीय व्यक्ती अशी सध्याची व्यवस्था भाजपने केली होती. मोदी-शहांची कार्यपद्धती पाहता ते या दोन्ही पदासाठी दुसरी संधी त्याच व्यक्तींना देतील अशी शक्यता नाही.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार मतदान करतात. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य हे ७०० इतके असेल. प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य हे त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या आधारावर ठरते, त्यासाठी १९७१ च्या जणगणनेचा आधार घेतला जातो. देशातल्या एकूण मतांचे मूल्य १० लाख ८६ हजार ४३१ इतके होते. यापैकी ज्या उमेदवाराला ५ लाख ४३ हजार २१६ मते मिळतात, तो विजयी ठरतो.
२०२४ च्या निवडणुकीआधी भाजपला आव्हान देण्याची संधी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना मिळणार आहे. कारण मागच्या वेळी देशात जितके आमदार भाजपचे होते, त्यात काहीशी घट झालेली आहे. दुसर्या बाजूला भाजपला टक्कर देण्यासाठी इतर पक्षांची एकजुट हवी असेल, तर कॉंग्रेसने आपला उमेदवार देण्याचा हट्ट सोडावा अशी चर्चा विरोधकांत आहे. लोकसभा निवडणुकीआधी एनडीए विरुद्ध यूपीए या लढतीची झलक या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.