आदिवासी समाजाने स्वत:ला हीन समजू नये. आदिवासी समाज हा आपल्या वन, पाणी आणि जमिनीचा जीवनदाता आणि संरक्षक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजभवनामध्ये राज्यातील विविध आदिवासी समाजातील नागरिकांशी संवाद साधताना काल केले.
यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर व इतरांची उपस्थिती होती.
गोव्यातील आदिवासी समाज दोन पावले पुढे आहे हे पाहून मला आनंद होत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ते सुशिक्षित आहेत आणि व्यावसायिक डॉक्टर, वकील आहेत आणि व्यावसायिक कामातही व्यस्त आहेत, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.
गोवा हे कदाचित देशातील एकमेव असे राज्य आहे जेथे मुख्यमंत्र्यांकडे आदिवासी विभाग आहे. हे पाहता गोव्यातील आदिवासी समाज जीवनमान सुधारण्यात आणि त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात कधीही मागे राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आदिवासी कल्याण खात्याकडून आदिवासी समाजासाठी विविध 17 योजना राबविण्यात येत आहेत. वन हक्क कायद्याखाली 1221 जणांना जमिनीचा मालकी हक्क देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी भारताच्या राष्ट्रपतींना रांगोळी कलाकार आकाश नाईक यांनी तयार केलेले त्यांचे पोर्ट्रेट सादर केले.