>> हीरक महोत्सवी वर्षाला आजपासून प्रारंभ
>> राजधानी सजली
>> ठिकठिकाणी पोलीस कुमक
आज दि. १९ डिसेंबर रोजी ५९ वा गोवा मुक्तिदिन राज्यात साजरा होत असून मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सवी वर्षाला आज पणजी शहरात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या खास उपस्थितीत थाटात सुरूवात होणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी काल राजधानीत जोरात सुरू होती.
कांपाल येथे होणार असलेल्या मुख्य सोहळ्याला राष्ट्रपती हजर राहण्यापूर्वी पणजी शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून गोवा मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत. त्यामुळे आझाद मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम काल जोरात सुरू होते. आझाद मैदानावर रंगरंगोटीचे, सजावटीचे व स्वच्छतेचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले असून काल परत एकदा त्यावर अंतिम हात फिरवण्यात येत होता. आझाद मैदानाच्या आसपासही रंगरंगोटीचे काम करण्यात आलेले असून तेथे वाहने पार्क करण्यावर दोन दिवसांपासूनच पूर्ण बंदी घालण्यात आली होती. काल पोलीस अधिकार्यांनीही सुरक्षेच्या कारणास्तव आझाद मैदान तसेच जेथे मुख्य सोहळा होणार आहे त्या दयानंद बांदोडकर मैदानावर हजेरी लावून पाहणी केली.
राजधानीला लष्करी छावणीचे स्वरूप
दरम्यान, राष्ट्रपतींचे आज राजधानी पणजीत आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काल पणजी शहराला लष्करी छावणीचे रुप प्राप्त झाले होते. काल शहरातील कानाकोपर्यात पोलीस कुमक दिसत होती. राष्ट्रपतींचे आज दुपारी १.०५ वा. दाबोळी येथील आयएनएस हंसा या नाविक तळावर आगमन होईल. तेथून १.३५ वा. त्यांचे काबो राजभवनावर आगमन होईल. संध्याकाळी ५.४० वा. राष्ट्रपती आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतील. तर संध्याकाळी ६ वा. दयानंद बांदोडकर मैदानावर गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त होणार असलेल्या प्रमुख कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असतील. हा कार्यक्रम ४५ मिनिटांचा असेल. तर नंतर दीड तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
वार्षिक मुक्तिदिन कांपाल मैदानावर
दरम्यान, सकाळी ९.१५ वा. गोवा मुक्तिदिनाचा वार्षिक समारंभ कांपाल येथील परडे मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे यावेळी तिरंगा फडकवून पोलीस पथकाकडून मानवंदना स्वीकारतील. त्याशिवाय राज्यातील प्रत्येक तालुक्यातही मुक्तिदिन आयोजित करण्यात येईल.
पोलीसकर्मीचा सत्कार
पोलीस खात्यात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी आज गोवा मुक्तिदिनी सात पोलीस कर्मींचा मुख्यमंत्र्यांहस्ते सुवर्णपदक पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. या सात पोलीसकर्मींमध्ये डिचोलीचे एमडोपीओ, उपअधीक्षक गुरूदास गावडे, कोलवा येथील वाहतूक पोलीस विभागाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर, मडगाव येथील विशेष पोलीस विभागाचे उपनिरीक्षक सुरेंद्र कोमरपंत, कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष नाईक, एमटी पणजीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हिल्सन डिसोझा, कळंगुट पोलीस स्थानकाच्या महिला हवालदार अविता नोरोन्हा, फोंडा वाहतूक पोलीस विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप सिनारी यांचा समावेश आहे. दरम्यान, अग्निशामक दलातील तिघा कर्मचार्यांनाही चांगल्या सेवेसाठी मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदक प्राप्त झाले असून त्यात उपअधिकारी अशोक परब, फायर फाईटर दीपक शेटगावकर तसेच वॉयरूम ऑपरेटर सीताराम कामत यांचाही समावेश आहे.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून
मुक्तिदिनाच्या शुभेच्छा
गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना गोवा मुक्तिदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात, भारतीय लष्कराच्या जवानानी धाडस आणि शौर्य दाखवून १९६१ साली गोव्याला मुक्त केले. या संस्मरणीयदिनी धाडसी सैनिक, निःस्वार्थ स्वातंत्र्यसैनिकांना आपण अभिवादन करूया. गोवा हा जातीय सलोखा आणि शांततेसाठी लोकप्रिय असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण दिनी आपण सर्वांनी गोव्याला देशातील उत्कृष्ट राज्य बनविण्याचा संकल्प करूया असे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात, गोव्याच्या मुक्तीसाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी खूप त्रास सहन केले. त्यांच्या त्यागामुळे आज आपण आनंदाचे जीवन जगत आहोत.
मुक्तीनंतर गोवा राज्याने आपल्या सामाजिक, सांस्कृतिक वारशाचे जतन करून सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात भरीव प्रगती साधली आहे. आपण राज्याच्या पुढील विकासासाठी संकल्प करूया तसेच शांतता आणि सलोख्याच्या वारशाचे जतन करण्यास योगदान देऊया, असे म्हटले आहे.
मुक्तिदिनाचे आमंत्रण नसल्याची
स्वातंत्र्यसैनिकांची कैफियत
काही स्वातंत्र्यसैनिकांनी मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला व्हिडिओद्वारे पाठवलेल्या संदेशातून सरकारने आपणाला मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सवासाठी आमंत्रणच दिले नसल्याची कैफियत मांडली.
गोवा स्वातंत्र्यासैनिक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग कुंकळ्येंकर यांनी, आपण स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा अध्यक्ष असतानाही आपणाला आमंत्रण नाही त्या अर्थी अन्य स्वातंत्र्यसैनिकांनाही आमंत्रण नसावे असे आपणाला वाटत असल्याचे सांगितले. करोडो रुपये केंद्राकडून हीरक महोत्सवासाठी मिळाले आहेत ते सत्कारणी लागायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली. आणखी एक स्वातंत्र्यसैनिक व कवी गजानन रायकर यांनीही व्हिडिओद्वारे पाठवलेल्या संदेशातून आपणालाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. स्वातंत्र्यसैनिक शशिकला होडारकर आल्मेदा यांनी पाठवलेल्या व्हिडिओतून सरकारने आपणालाही आमंत्रण पाठवले नसल्याचे सांगितले. केंद्राकडून आलेल्या निधीतून सरकारने राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती स्थळांचे नूतनीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
वामन प्रभुगावकर यांनीही सरकारने आपणाला गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवासाठीचे आमंत्रण दिले नसल्याचे सांगून सरकारने मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानाचे नूतनीकरण करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
स्वातंत्र्यसैनिकांना आवाहन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आझाद मैदान, पणजी आणि दयानंद बांदोडकर मैदान, कांपाल येथे होणार्या गोवा मुक्तीच्या ६०व्या वर्ष समारंभास स्वातंत्र्यसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. आमचे स्वातंत्र्य सैनिक आणि हुत्यात्म्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्यांची फळे चाखत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी, गोवा सरकारने माहिती व प्रसिद्धी खात्याद्वारे स्वातंत्र्यसैनिकांना निमंत्रणे पाठवली आहेत. तथापि, ज्या स्वातंत्र्यसैनिकांना निमंत्रण मिळाले नाही त्यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.