>> दोन दिवसांचा दौरा, कार्यक्रम जाहीर
>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती
गोवा मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गोव्यात उद्या दि. १९ डिसेंबर रोजी आगमन होत असून राष्ट्रपतींचा हा दौरा दोन दिवसांचा असेल, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिनो येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रपतींचे उद्या दि. १९ रोजी दाबोळी येथील आयएनएस हंसा या दाबोळी येथील नाविक तळावर दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी आगमन होणार आहे. यावेळी त्यांचे तेथे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने आपण, तसेच राजशिष्टाचार मंत्री या नात्याने माविन गुदिन्हो तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व अन्य काही मंत्री हजर असतील असे सावंत यांनी सांगितले.
तद्नंतर दाबोळी येथून १.३५ वा राष्ट्रपतींचे राजभवनवर आगमन होईल. नंतर संध्याकाळी ५.४०वा. राष्ट्रपती आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतील. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व राज्यपाल कोश्यारी हेही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतील.
तद्नंतर राष्ट्रपती गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कांपाल येथील बांदोडकर मैदानाकडे जातील. राष्ट्रपती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.
हीरक महोत्सवानिमित्त बांदोडकर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सोहळा हा संध्याकाळी ६ वा. सुरू होईल. कार्यक्रमाची सुरूवात ‘भांगराचे गॉय’ या गोव्यावरील गीताने होईल. तद्नंतर गोव्याच्या इतिहासाचे दर्शन घडवणारा एक ३० मिनिटांचा लघुपट दाखवण्यात येईल. नंतर मंत्री गुदिन्हो, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री या नात्याने आपले तसेच राज्यपाल व सर्वांत शेवटी राष्ट्रपतींचे भाषण होईल.
वरील कार्यक्रमानंतर दीड तासाच्या एक सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला राज्यातील बाराही तालुक्यातील बारा पथके लोककला सादर करतील. या कार्यक्रमात एकूण १५० ते २०० कलाकार सहभागी होतील. ‘गोंयचो गाज’ असे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नामकरण करण्यात आले असून राष्ट्रपती हा कार्यक्रम ४५ मिनिटे पाहणार असल्याचे मुख्यमत्री म्हणाले.
एका कार्यक्रमावर १००
कोटी खर्च नव्हे
१९ डिसेंबर रोजी होणार्या एकाच कार्यक्रमावर राज्य सरकार १०० कोटी रु. खर्च करणार असल्याचा खोटा आरोप काही विरोधक करु लागले असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की १०० कोटी रु. हे एका नव्हे तर वर्षभरासाठीच्या कार्यक्रमांवर खर्च करण्यात येणार आहेत. शिवाय हा निधी फक्त कार्यक्रम करण्यावरच खर्च करण्यात येणार नसून राज्यभरात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या दुरावस्थेत असलेल्या स्मारकांची व किल्ल्यांची दुरुस्ती यावरही हा निधी खर्च करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्षभर आयोजित करण्यात येणार असलेल्या कार्यक्रमात फक्त आणि फक्त गोमंतकीय कलाकारांनाच संधी देण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले.
राष्ट्रपतींना येऊ नका म्हणणारे देशद्रोही
गोवा आपल्या मुक्तीचा हीरक महोत्सव साजरा करीत असल्यामुळे आम्ही राष्ट्रपतींना सोहळ्याला हजर राहण्यासाठी बोलावले असून त्यांना पत्र लिहून सोहळ्याला येऊ नका, असे सांगणारे हे देशद्रोही आहेत असे गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले.
फक्त ४०० जणांना आमंत्रण
कोरोना महामारी लक्षात घेऊन या कार्यक्रमासाठी फक्त ४०० जणांनाच आमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.
सकाळी दरवर्षीसारखा कार्यक्रम
यंदा हीरक महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हजेरीत गोवा मुक्तिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असला तरी सकाळच्या वेळी दरवर्षाप्रमाणेच कार्यक्रमही होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बोधचिन्हाचे अनावरण
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आल्तिनो येथील एका विशेष कार्यक्रमात हीरक महोत्सवी वर्षासाठीच्या बोधचिन्हाचे अनावरण केले. त्यावेळी माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार, खात्याचे संचालक सुधीर केरकर हजर होते. या बोधचिन्हासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत १६४ जणांनी भाग घेतला होता. त्यापैकी गोठण, वेलिंग येथील भावेश वेलिंगकर यांनी पाठवलेल्या बोधचिन्हाची निवड झाली असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. बोधचिन्ह विजेत्याला १० हजार रु. चे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकारच्या वर्षभरातील सर्व पत्रांवर हे बोधचिन्ह असेल.
२० रोजीही राष्ट्रपती गोव्यात
मुक्तिदिनाच्या दुसर्या दिवशी म्हणजे दि. २० रोजी सकाळी राष्ट्रपती राजभवनवर राज्यपाल व मुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करणार आहेत. नंतर कुटुंबीयांबरोबर त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम पार पडल्यानंतर ते संध्याकाळी नवी दिल्लीकडे प्रयाण करतील. गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमाला आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपती येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
३ कोटींची उधळपट्टी ः कॉंग्रेस
गोव्यातील भाजप सरकार १९ डिसेंबरच्या कार्यक्रमावर ३ कोटी १० लाख रुपयांची उधळपट्टी करणार असल्याचा आरोप दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोजेफ डायस यांनी केला आहे. मुक्तिदिन कार्यक्रमात भाजप सरकारला स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा विसर पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमासाठी ४०० निमंत्रणे पाठवल्याचे सांगितले असले तरी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना अद्याप निमंत्रण वा सूचनापत्रही मिळालेले नाही. या कार्यक्रमात गोव्यातील बारा तालुक्यांतील कलाकार आपली कला सादर करणार आहेत असे मुख्यमंत्री म्हणतात. या कलाकारंचा तपशील सरकारने जाहीर करावा अशी मागणी डायस यांनी केली आहे.