राष्ट्रपतींचा गोवा दौरा रद्द

0
14

>> सभापती रमेश तवडकर यांची माहिती

मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी गोव्यात येणार असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ९ डिसेंबर रोजीची गोवा भेट रद्द करण्यात आली असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रपती व पंतप्रधान यांचे लागोपाठ गोव्यात आगमन झाल्यास राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण पडण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ९ डिसेंबर रोजीची गोवा भेट रद्द करण्यात आली आहे. काणकोण येथे ७ डिसेंबरपासून पाच दिवसीय लोकोत्सव सुरू होत असून, ९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लोकोत्सवासाठी काणकोणमध्ये येणार होत्या; परंतु ११ डिसेंबरला मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याने त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्यात आगमन होणार आहे. केवळ दोन दिवसांच्या अंतराने राज्यात राष्ट्रपती व पंतप्रधान यांचे आगमन झाल्यास त्याचा राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रपतींची गोवा भेट रद्द करण्यात आली असल्याचे तवडकर यांनी सांगितले.

लोकोत्सवाला २ लाख लोकांची हजेरी

७ ते ११ डिसेंबर या दरम्यान पैंगीण येथे होणार्‍या लोकोत्सवाला सुमारे २ लाख लोक उपस्थिती लावणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी यावेळी सांगितले.