रावणफोंड येथे चौपदरी उड्डाणपूल बांधणार

0
115

मडगाव (न. प्र.)
दवर्ली वाहतूक बेटाचे बांधकाम व सौंदर्यीकरण तसेच दवर्ली जंक्शन ते रावणफोंड जंक्शनपर्यंत रस्त्याचे हॉटमिक्स कामाचा शुभारंभ काल माजी मुख्यमंत्री व आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते झाला. यावेळी श्री. कामत यांनी रावणफोंड पुलावर चार पदरी उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केली.
दवर्ली वाहतूक बेटाचे बांधकाम व सौंदर्यीकरणाचा प्रकल्प कित्येक वर्षांपासून बांधण्याचे नियोजन करण्यात येत होते. कित्येक तज्ञांचे मत घेतल्यानंतर सुंदर आराखडा तयार करून शुभारंभ होत असल्याबद्दल आमदार कामत यांनी आनंद व्यक्त केला. या आधी कित्येकदा प्रायोगिक तत्वावर पहाणी करून सर्व अचडणी समजून घेऊन हा आराखडा तयार केला आहे. या बेटाच्या सौंदर्यीकरणाबद्दल या भागाचे सौंदर्य वाढेल. मात्र, केरकचर्‍याचा प्रश्‍न असून त्यावर लवकरच उपाय करणार असल्याचे कामत यांनी सांगितले.
आके वीज खात्यापासून व्हिक्टर इस्पितळापर्यंत वॉकिंग ट्रॅक बनविण्यात येणार असून त्याला बांधकाम मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तसेच पश्‍चिमोत्तर बगल रस्त्यावरील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन रावणफोंड येथे चारपदरी उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या सौंदर्यीकरणासाठी व हॉटमिक्सिंगसाठी अंदाजे दोन कोटी रुपये खर्च येणार आहे व त्याचा ठेका मेसर्स आर. एस. बी. कंस्ट्रक्शनला देण्यात आले असून एका वर्षात पूर्ण होईल असे आमदार कामत म्हणाले.
जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर यांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता विजयकुमार वेरेकर, अधिक्षक राजेंद्र कामत, विजय म्हार्दोळकर, आग्नेलो बाईश, वीज खात्याच्या रेश्मा मॅथ्यू, पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, पालिका अभियंता मनोज आर्सेकर, दवर्ली पंचायतीचा सरपंचा विनायक कुलकर्णी, उपसरपंच दीपक मंगलम्, पंच, नगरसेवक दीपा शिरोडकर, सुगंधा बांदेकर, प्रभु देसाई, डोरीस टेक्सेरा, मनोज मसुरकर, कॉंग्रेसचे अतुल वेर्लेकर, आर. एस. कामत, डॉ. दीपक लंवदे, घनश्याम शिरोडकर, वाहतूक पोलीस उपअधिक्षक प्रबोध शिरवईकर आदी उपस्थित होते. दामोदर शिरोडकर यांनी स्वागत केले. अनिल पै यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.