रायबंदर भागातील रस्त्यांची दुरुस्ती 15 दिवसांत होणार

0
5

>> स्मार्ट सिटी प्रशासनाची गोवा खंडपीठात माहिती

स्मार्ट सिटी प्रशासनाकडून रायबंदर भागातील रस्त्यांची दुरुस्ती येत्या 15 दिवसांत करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल देण्यात आली.
स्मार्ट सिटी प्रशासनाकडून 11 रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यात रायबंदर भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा समावेश आहे. रायबंदर भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकरणी जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी देण्यात आली.
पणजी महानगरपालिकेने पोलीस मुख्यालयासमोर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती पणजी महानगरपालिकेने न्यायालयात दिली. तसेच, इतर दोन रस्त्यांच्या कामाबाबत पुढील आठवड्यात माहिती दिली जाणार आहे.
आल्तिनो येथील जॉगर्स पार्कजवळील रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जात आहे, अशी माहिती महानगरपालिकेने न्यायालयात दिली. पणजीतील हा रस्ता असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन दुरुस्तीसाठी संबंधितांकडे पाठपुरावा करण्याची गरज असून, याबाबत महानगरपालिकेला पुढील आठवड्यात माहिती द्यावी लागणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल ॲड. देविदास पांगम यांनी दिली.