रायबंदरमध्ये 69 कोटी रुपये खर्चून मलनिस्सारण वाहिनी

0
17

>> संजीत रॉड्रिग्स; पाच महिन्यांत काम पूर्ण केले जाणार

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अंदाजे 69 कोटी रुपये खर्चून विठ्ठल मंदिर-रायबंदर ते पाटो-रायबंदर दरम्यान पाच किलोमीटरची मलनिस्सारण वाहिनी घालण्याचे काम पाच टप्प्यांत आणि पाच महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, मलनिस्सारण वाहिनीचा पहिला टप्पा पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेऊ नये; अन्यथा मलनिस्सारण वाहिनी घालण्याचे काम रोखले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
रायबंदर भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मलनिस्सारण वाहिनी घालण्याच्या कामाची माहिती देण्यासाठी रायबंदर भागातील नागरिकांची महानगरपालिकेच्या सभागृहात काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत रायंबदर येथील विठ्ठल मंदिर ते पाटो रायबंदर दरम्यान मुख्य मार्गावर हाती घेण्यात येणाऱ्या कामाची माहिती नागरिकांना देण्यात आली. पाच किलोमीटर मलनिस्सारण वाहिनी घालण्यासाठी पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक टप्पा साधारण 30 दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. स्थानिक नागरिकांना जास्त समस्या निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती संजीत रॉड्रिग्स यांनी दिली.

या बैठकीत स्थानिक नागरिकांनी विविध सूचना मांडून नागरिकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची मागणी केली. पहिल्या टप्पा पूर्ण करून दुसरा टप्प्याचे काम हाती घ्यावे. एक टप्पा पूर्ण करण्यासाठी 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला तरी हरकत नाही. मात्र अपूर्ण अवस्थेत काम ठेवून नागरिकांना त्रास करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही नागरिकांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजी शहरातील प्रमुख 18 जून या गजबजलेल्या रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी घालण्याचे काम दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे. पणजी मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी वापरलेली पद्धत ही ट्रेंचलेस हॉरिझॉन्टल डायरेक्ट ड्रिलिंग (टीएचडीडी) आहे, ज्यात पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्यावर खंदक खोदण्याची आवश्यकता नाही. 18 जून हा रस्ता फार्मसी कॉलेजपासून टप्प्या-टप्प्यात बंद केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.