अयोध्येतील राम मंदिर दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर असून, दहशतवाद्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ माजली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच पोलीस, सुरक्षा दल आणि प्रशासन सतर्क झाले आहे.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्यानंतर राम मंदिरासह महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एसएसपी राज करण नय्यर यांनी महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी अयोध्या राम मंदिरातील सुरक्षेचाही आढावा घेतला. दहशतवादी संघटनेने दिलेल्या धमकीवर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
अयोध्या धामची सुरक्षा व्यवस्था वेगवेगळ्या भागात विभागली गेली आहे आणि सुरक्षेसाठी पथके तयार केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, विविध झोनमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिसांव्यतिरिक्त पीएसीच्या अनेक कंपन्याही आल्या आहेत.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर पोलिस नजर ठेवून आहेत, अशी माहिती अयोध्येच्या सुरक्षेबाबत एसएसपी राज करण नय्यर यांनी दिली.
धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने ऑडिओ क्लिप व्हायरल करत राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये आमिर नावाच्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत म्हटले आहे की, आमची मशीद हटवून मंदिर बांधले आहे. आता ते बॉम्बने उडवणार. आमच्या तीन साथीदारांनी बलिदान दिले असून, आता हे मंदिर पाडावेच लागेल. मात्र ऑडिओ क्लिपची सत्यता किती हे स्पष्ट झालेले नाही.