राम मंदिराच्या उद्घाटनासाठी ट्रस्टकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण

0
14

अयोध्येतील राम मंदिराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाचा जंगी कार्यक्रम जानेवारीत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राम मंदिर ट्रस्टकडून पंतप्रधानांना या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले. राम मंदिराचे 22 जानेवारी 2024 ला दुपारी 12.30 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबत ट्विटरवर माहिती दिली. जय सीताराम! आजचा दिवस खूप भावनांनी भरलेला होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी माझ्या निवासस्थानी भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. मी स्वत:ला खूप धन्य मानतोय. हे माझ्य भाग्य आहे की, मी या ऐतिहासिक क्षणांचा साक्षी बनणार आहे, असे मोदींनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रसारण देश-विदेशात लाईव्ह केले जाणार आहे. देशातील सगळ्या राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. तसेच राम मंदिराच्या आंदोलनात ज्या कारसेवकांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनाही निमंत्रण दिले जाणार आहे.