नामवंत कायदे पंडीत तथा माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचे काल सकाळी ७.४५ वा. वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणतील आरोपींच्यावतीने जेठमलानी यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. जेठमलानी यांच्यावर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
गेल्या काही महिन्यांपासून राम जेठमलानी आजारी होते अशी माहिती त्यांचे पुत्र महेश जेठमलानी यानी दिली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राम जेठमलानी यांनी शहर विकासमंत्री म्हणून काम केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींनी जेठमलानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
निष्णात कायदेतज्ज्ञ गमावला : राष्ट्रपती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोक संदेशात जेठमलानी यांच्या निधनामुळे देशाने एका निष्णात कायदेतज्ज्ञाला गमावले आहे असे नमूद केले आहे.
कोणत्याही विषयावर निर्भिड
मतप्रदर्शन : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी म्हटले आहे की जेठमलानी कोणत्याही विषयावर आपले मत निर्भिडपणे व्यक्त करत असत. त्यांच्या रूपात देशाने एक दिग्गज वकील गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे कायदा क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जेठमलानी यांच्या कायदेविषयक विद्वत्तेची प्रशंसा केली. आपल्या अशीलाची बाजू मांडताना जेठमलानी वाघ व्हायचे असे ते म्हणाले. अफाट घटनात्मक ज्ञानाबरोबर गुन्हेगारी कायद्याबद्दलचे धारदार सामर्थ्य असा संगम त्यांच्यात दिसून यायचा असे मेहता म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही जेठमलानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.