अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातील पूजेचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेने जाहीर केला आहे. मूर्ती ज्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे, तेथूनच कर्मकुटी विधीने पूजेला सुरुवात होणार आहे. मूर्ती तयार करणारे कारागीर प्रायश्चित पूजन करणार आहेत अशी माहिती विहिंपतर्फे देण्यात आली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 16 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीतील रुपरेषा तयार करण्यात आली आहे. या पवित्र काळात प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, राम लल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यापर्यंतच्या प्रत्येक विधीला वेगेळ महत्व असल्याचे विहिंपने म्हटले आहे.
25 लाख लोकांचा सहभाग
या कार्यक्रमात सुमारे 25 लाख लोक सहभागी होण्याची अपेक्षा विहिंपने व्यक्त केली आहे. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, 4000 संत आणि सुमारे 2200 पाहुणे यांच्यासह 6000 दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या वेळी सहा दर्शनांचे शंकराचार्य (प्राचीन शाळा) आणि सुमारे दीडशे ऋषी-मुनीही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सुमारे 25 लाख लोक सहभागी होऊ शकतात असे म्हटले आहे.
अडवाणी सहभागी होणार
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी अडवाणींची तब्येत खराब असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नव्हते. आलोक कुमार यांनी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते.
दुसरीकडे काँग्रेसने प्राणप्रतिष्ठाला जाण्यास नकार दिला. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. हा भाजप आणि आरएसएसचा कार्यक्रम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
दि. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा होईल. वारणसीचे वैदिक आचार्य ही पूजा करणार आहेत. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि धर्माचार्य संपर्क प्रमुख अशोक तिवारी यांनी सांगितले की, आचार्य गणेशवरशास्त्री द्रविड, प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित, अरुण दीक्षित, सुनील दीक्षित, दत्तात्रेय नारायण रटाटे, गजानन जोतकर, अनुपम दीक्षित आदी हा सोहळा संपन्न करणार आहेत. तसेच 11 यजमान देखील असतील.
प्राणप्रतिष्ठा मुहूर्त
22 जानेवारी 2024 रोजी रात्री 12.29 ते 12.30 या वेळेत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अवघ्या 84 सेकंदात पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळा या पूजनीय मूर्तीला देवत्व प्रदान करेल आणि अयोध्येतील राम मंदिराची प्रतिक्षा अखेर संपेल.
सात दिवस प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम
22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक सोहळा 16 जानेवारीपासून सुरू होईल आणि सात दिवस चालेल.
16 जानेवारी : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टने नियुक्त केलेले यजमान तपश्चर्येला सुरुवात करणार आहेत. शरयू नदीच्या तीरावर दशविध स्नान, विष्णूपूजा आणि गायींचा नैवेद्य होणार आहे.
17 जानेवारी : 5 वर्षांच्या रामलल्लाच्या मूर्तीसह एक ताफा अयोध्येला पोहोचेल. मंगल कलशात शरयू नदीचे पाणी घेऊन भाविक रामजन्मभूमी मंदिरात येणार आहेत.
18 जानेवारी : गणेश अंबिका पूजन, वरुण पूजा, मातृका पूजा, ब्राह्मण वरण आणि वास्तु पूजनाने औपचारिक विधी सुरू होतील.
19 जानेवारी : पवित्र अग्नी प्रज्वलित केला जाईल. यानंतर नवग्रह स्थापन करून हवन करण्यात येईल.
20 जानेवारी : रामजन्मभूमी मंदिराचे गर्भगृह शरयूच्या पाण्याने धुतले जाईल, त्यानंतर वास्तुशांती आणि ‘अन्नाधिवास’ विधी होईल.
21 जानेवारी : रामलल्लाच्या मूर्तीला 125 हंड्यांच्या पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे.
22 जानेवारी : सकाळच्या पूजेनंतर दुपारी मृगशिरा नक्षत्रात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे.