रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून निमंत्रणे पाठवण्याचे काम सुरू; 22 जानेवारीला भव्यदिव्य सोहळा
अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अयोध्येतील नव्या भव्य दिव्य राम मंदिरात रामलल्लांच्या अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात सिनेकलाकार, साहित्यिक, राजकीय व धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. या प्राणप्रतिष्ठेसाठी 8 हजार जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 जानेवारीला अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन करतील आणि त्यांच्या हस्ते रामलल्लाचा अभिषेकही केला जाईल.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास सात हजार जणांना प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. याशिवाय, दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योगगुरू बाबा रामदेव यांचा समावेश आहे.
मंदिर आंदोलनात सहभागी नेत्यांना पहिले निमंत्रण
साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींशिवाय राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे बडे नेतेही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दिसणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय विविध धर्मगुरूही रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यात केवळ हिंदूच नव्हे, तर जैन धर्मातील महागुरूंचाही समावेश करण्यात आला आहे. जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी यांनाही मंदिर ट्रस्टने कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा
नियोजित कार्यक्रमाच्या अभिषेक समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, अभिषेक सोहळा त्यांच्याच हस्ते होणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व पाहुण्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. या कार्यक्रमात सर्व संत आणि धर्मगुरूंना सहभागी होण्यासाठी नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व संतांना त्यांचे आधारकार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल, पर्स, पिशवी, छत्री, कक्ष, सिंहासन, वैयक्तिक पूजा साहित्य किंवा गुरू पादुका कार्यक्रमस्थळी नेण्यास मनाई असणार आहे.
सचिन, विराट अन् रोहितलाही निमंत्रण
रामलल्लाचा अभिषेक सोहळा दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नामांकीत व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये क्रीड क्षेत्रातील दिग्गजांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू भाईचुंग भूतिया, बॉक्सर मेरी कोम, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, पी. गोपीचंद, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांना निमंत्रणे पाठवली आहेत. याशिवाय सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही राम मंदिराच्या उद्घाटनाची निमंत्रणे पाठवली जात आहेत.