रामराज्याची आस

0
26

ज्याची भारतीय समाज शतकानुशतके प्रतीक्षा करीत आला, तो ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरामध्ये आज रामललाच्या म्हणजे बाल्यावस्थेतील रामाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मूर्तीतच का, जणू ह्या राष्ट्रामध्येच प्राण फुंकला गेला आहे. प्रभू श्रीराम त्यांच्या हक्काच्या जागी विराजमान झाले आहेत, म्हणजे लवकरच ते आपल्या राष्ट्राचा कारभार हाती घेऊन रामराज्य साकारतील अशी काहीशी भाबडी, पण सकारात्मक भावना सर्वत्र निर्माण झालेली दिसते. मर्यादापुरुषोत्तम म्हणून अजरामर झालेल्या प्रभू श्रीरामांच्या जीवनातील उच्चतम मूल्यांचे स्मरण भारतीय जनमानस पिढ्यानपिढ्या करीत आले; प्रभू श्रीराम आणि त्यांचे रामराज्य हा उच्चकोटीचा आदर्श आहे असे मानत आले. देशामध्ये हे रामराज्य पुनःप्रस्थापित करायचे असेल तर ते केवळ एक व्यक्ती आणू शकणार नाही, त्यासाठी श्रीरामांचा जयघोष केवळ ओठांतून न करता ह्रदयातून झाला पाहिजे, प्रत्येकातील तो ह्रदयस्थ नारायण जागला पाहिजे अशी अपेक्षा आम्ही गेल्या शनिवारी नवप्रभेने प्रसिद्ध केलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा विशेषांकातील विशेष संपादकीयात व्यक्त केली होती. अयोध्येतील राममंदिरातील श्रीराम प्रतिष्ठापना ही केवळ प्रतिकात्मक आहे. त्यानिमित्ताने देशामध्ये झालेले सांस्कृतिक जागरण ही खरी उपलब्धी आहे. त्यामुळे आज जेव्हा रामललाच्या मूर्तीमध्ये चेतना फुंकली जाईल, तेव्हा ती चेतना साऱ्या राष्ट्रामध्ये प्रस्फुरित झाली आणि त्या चेतनेतून रामराज्यातील मूल्यादर्शांवरून वाटचाल करण्याची प्रेरणा जर प्रत्येकाला मिळाली, तरच ह्या साऱ्या प्रयत्नांचे सार्थक होईल. रामराज्याची ही आस बाळगताना मुळामध्ये रामराज्य म्हणजे काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. रामचरितमानसच्या उत्तरकांडात गोस्वामी तुलसीदासांनी रामराज्याचे वर्णन आपल्या चौपायांतून केले आहे –
राम राज बैठे त्रैलोका । हर्षित भए गए सब सोका ॥
बयरू न काहू सन कोई । राम प्रताप विषमता खोई ॥
अर्थ – राम राज्यावर बसले आणि त्रैलोक्यातील लोक हर्षभरीत झाले. सगळे शोक दूर झाले. कोणाचे कोणाशी वैर उरले नाही. सगळी विषमता श्रीरामाच्या प्रतापाने संपुष्टात आली.
दैहिक दैविक भौतिक तापा । राम राज नहिं काहुहि ब्यापा ॥
सब नर करहिं परस्पर प्रीती । चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती ॥
अर्थ – रामराज्यामध्ये कोणाला दैहिक, दैविक आणि भौतिक त्रास उरला नाही. सगळे मनुष्य एकमेकांवर प्रेम करत आहेत आणि नीतीनुसार स्वधर्मपालन करीत आहेत.
चारिउ चरन धर्म जग माहीं । पूरि रहा सपनेहुँ अघ नाहीं ।
राम भगति रत नर अरु नारी । सकल परम गति के अधिकारी ॥
अर्थ – धर्म आपल्या सत्य, शौच, दया आणि दान ह्या चारही चरणांनी जगात परिपूर्ण बनलेला आहे. स्वप्नातही कुठे पाप दिस नाही. सर्व स्त्रीपुरुष रामभक्तीत रत आहेत आणि सगळे परमगतिचे म्हणजे मोक्षाचे अधिकारी आहेत.
अल्पमृत्यु नहिं कवनिउ पीरा । सब सुंदर सब बिरुज सरीरा ॥
नहिं दरिद्र कोउ दुखी न दीना । नहिं कोउ अबुध न लच्छन हीना ॥
अर्थ – कोणाचाही अल्पायुत मृत्यू होत नाही, ना कोणाला कसला त्रास आहे. सर्वांची शरीरे निरोगी आणि सुंदर आहेत, ना कोणी दरिद्री आहे, ना दुःखी. ना कोणी अडाणी ना दुर्लक्षणी.
हे सगळे रामराज्य काही आकाशातून अवतरले नव्हते. प्रभू श्रीरामांच्या अंगभूत गुणांमुळेच ते आपल्या प्रजेला एवढे चांगले प्रशासन देऊ शकले. उद्या राज्याभिषेक होणार असताना अचानक वडील सांगतात की वनवासाला निघून जा, तरी एक प्रश्नही न विचारता चौदा वर्षे वनवासाला निघून जाणारे राम काय किंवा वनवासाला निघून गेलेल्या आपल्या बंधूच्या चरणपादुका सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावे राज्य करणारा भरत काय, हे सगळे स्वप्नवत वाटावे असा आजचा काळ आहे. चित्रकुटाहून निरोप घेताना भरताला राम राजा – प्रजा संबंधांविषयी सांगतात – मुखिया मुख सों चाहिए, खान पान को एक । पालै पोसै सकल अंग । तुलसी सहित विवेक ॥
मुखिया म्हणजे नेता हा मुखासारखा असला पाहिजे. मुख जरी एकटे भक्षण करीत असले, तरी ते संपूर्ण शरीराचे पालनपोषण करीत असते! असे रामराज्य येण्यासाठी अशा उदात्त विचारसरणीचे अनासक्त समर्पित नेतृत्व प्रत्येक ठिकाणी निर्माण झाले, तर आणि तरच रामराज्य म्हणजे भ्रष्टाचारविरहित, लोककल्याणकारी पारदर्शक आदर्श सुशासन अवतरू शकेल!