रामकृष्ण नायक यांना मान्यवरांची श्रद्धांजली

0
9

गोवा हिंदू असोसिएशन आणि स्नेहमंदिर यांचे संस्थापक रामकृष्णबाब नायक यांच्या निधनाने दु:ख झाले. समाजकार्य ही त्यांची जीवनशैली होती. ते स्वत: एक संस्था होते. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

जनार्दन वेर्लेकर
गोव्यातील समाजकार्यातील अध्वर्यु म्हणून ओळखले जाणारे केशव नायक यांचे ते सुपूत्र होते. वडिलांपासून त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता. आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेला वाहून घेतलेल्या रामकृष्ण नायक यांनी विवाह केला नाही. त्यामुळे ज्या ज्या संस्थांशी संबंध आला त्या संस्थांतील कार्यकर्ते त्यांचे एकप्रकारे कुटुंब होते. त्यांच्या निधनाबद्दल गोमंत विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी दु:ख व्यक्त केले.

सुदिन भगवंत नायक
माझे वडिल भगवंत नायक व रामकृष्ण काका हे जवळचे मित्र. बालपणापासून मी त्यांचे कार्य बघत आलो आहे. त्यांचे वडिल केशवबाब हे समाजसेवा संघाच्या संस्थापकापैकी एक. रामकृष्णबाब यांना या संस्थेबद्दल व शिक्षणाबद्दल आस्था होती. मुंबईला असतानाही फोन करून शिक्षण संस्थेसंबंधी माहिती घेत. नवीन कार्यक्रम, नवीन योजना काय आहेत याविषयी विचारपूस करीत. धी गोवा हिंदू असोसिएशन, स्नेह मंदिराबरोबर समाजसेवा संघा या संस्थेबद्दल प्रेम होते. त्यांच्या निधनाने एक पर्व संपले असे समाजसेवा संघाचे अध्यक्ष सुदिन नायक यांनी सांगितले.

प्रसाद लोलयेकर
समाजसेवा मंदिरांतील देव अनंतात विलिन झाले. एक पर्व संपले. मराठी रंगभूमीच्या पाच दशकांतील इतिहासाचे ते जीवंत प्रतिक होते. त्यांनी अनके संस्था उभारल्या व प्राण ओतून, कष्टाने त्याचे जतन केले. त्यांनी नीतीमूल्याचा मजबूत पाया घातला, असे प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.

डॉ. व्यंकटेश हेगडे
थोर समाजसेवक आमच्यामध्ये राहिले नाहीत. गोव्याचा आवाज व कला त्यांनी सर्वत्र पोहचविली. गोवा हिंदू असोसिएशनचे आधारस्तंभ होते. मा. दत्ताराम यांना नाट्य कलेत पुढे आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता असे डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी सांगितले.

अजित हेगडे
रामकृष्ण नायक यांच्या निधनाने एक प्रस्ताचा अंत झाला. त्यांचे कार्य हे अवर्णनिय होते. अनेक संस्था जन्माला घातल्या व प्राणपणाने वाढविल्या असे अजित हेगडे यांनी सांगितले.

अनुप प्रियोळकर
रामकृष्णबाब व आपला संबंध पहिल्यांदा स्नेह मंदिराच्या इमारतीच्या पायाभरणीच्या वेळी झाला. त्यानंतर अखेरपर्यंत जवळीक राहिले. स्नेहमंदिराच्या प्रत्येक कार्यात आपणास सामावून घेत, चर्चा करीत मार्गदर्शन करीत. ते आपणासाठी एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. संस्था कशा चालवाव्यात हे मार्गदर्शन मला मिळाले, असे अनुप प्रियोळकर यांनी सांगितले.

राजेंद्र तालक
रामकृष्णबाबच्या निधनाने आपणास अत्यंत दु:ख होत आहे. ते आपल्या वडिलांसमान एक गुरू होते. त्यांच्याकडून सामाजिक कार्य करण्यासंबंधी मार्गदर्शन मिळाले. स्नेह मंदिराच्या कामासाठी त्यांनीच आणले व नि:स्वार्थबुद्धीत काम करण्याची प्रेरणा दिली. ते प्रेरणास्रोत होते असे रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सांगितले.

दामू नाईक, माजी आमदार
रामकृष्ण नायक यांनी तन, मन आणि धनच नव्हे, तर आपलं अवघं आयुष्य अर्पून ‘गोवा हिंदू’ची आजवर नि:स्वार्थी व समर्पित भावाने सेवा केली आहे. वयाच्या 95व्या वर्षांपर्यंत ते तरुणाईच्या उत्साहाने काम करीत. ‘गोवा हिंदू’च्या आजवरच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी एका पैशाचेही मानधन न घेता संस्थेसाठी मानद सेवा दिली. त्यांच्यात उत्तम नाटक हेरण्याची जाण आणि कलावंतांची अचूक पारख करण्याची वृत्ती होती. त्यांनी पं. जीतेंद्र अभिषेकींना नाटकात आणले. ऐंशीच्या दशकात त्यांनी बांदिवडे येथे ‘स्नेहमंदिर’ नावाचा वृद्धाश्रम उभा केला. ते गोमंतकीय रंगभूमीचे तपस्वी साधक होते, अशा शब्दांत माजी आमदार दामू नाईक यांनी श्रद्धांजली अर्पण केली.