राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला ‘क्लिन चिट’ दिली असल्याचा भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर व सदानंद तानावडे यांनी केलेला दावा तो खोठा असल्याचे काल कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरच निकाल दिला असून सीबीआय व इतर संस्थांस राफेलची चौकशी करण्यास बंधन नसल्याचे स्पष्ट केले आहे हे समजून घेणे गरजेचे असल्याचे पणजीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये राफेल व्यवहाराच्या फाईल्स आहेत असा कथित गौप्यस्फोट करणारे मंत्री विश्वजीत राणे यांच्या ऑडियो संभाषणाच्या टेपबद्दल भाजपने पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना पोलीस तक्रार करण्यास सांगावे व सदर टेपचा खरेपणा तपासून पाहण्याची मागणी करावी ज्यामुळे राहूल गांधीच नव्हे तर संपूर्ण देशालाही राफेल प्रकरणाची सत्य बाजू समजू शकेल, असे पणजीकर म्हणाले.
गोव्यात शेकडो समस्या व प्रश्न असून त्याबाबत हे भाजप नेते का बोलत नाहीत असा सवालही पणजीकर यांनी केला.