राफेल नदालच अव्वल!

0
108

एटीपीने यंदाच्या कॅलेंडर वर्षातील आपली अखेरची क्रमवारी काल सोमवारी जाहीर करताना स्पेनचा दिग्गज राफेल नदालच्या अव्वलस्थानावर शिक्कामोर्तब केले. नदालला लंडनमध्ये झालेल्या एटीपी फायनल्सच्या पात्रता फेरीचा अडथळा देखील ओलांडता आला नाही. परंतु, सर्बियाच्या नोवाक जोकोविचला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणे शक्य न झाल्याने नदालने ९९८५ गुण घेत जोकोविचला ८४० गुणांनी मागे टाकले. वर्षाची अखेर अव्वलस्थानावर करण्याची नदालची ही पाचवी वेळ आहे.

फेडरर व जोकोविच यांनीदेखील प्रत्येकी पाचवेळा अशी कामगिरी केली असून पीट सँम्प्रास (६) या बाबतीत आघाडीवर आहे. नदाल व जोकोविच यांनी चालू कॅलेंडर वर्षांत प्रत्येकी दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन व विंबल्डन तर नदालने फ्रेंच ओपन व युएस ओपन जिंकत जोकोविचला आव्हान दिले. रॉजर फेडररने मोसमाची सांगता तिसर्‍या स्थानासह केली. ३८ वर्षीय फेडरर याने इतर स्पर्धांमधील आपला सहभाग कमी केला असून ग्रँडस्लॅम तसेच या स्पर्धेपूर्वी होणार्‍या सराव स्पर्धांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. फेडररला फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत नदालकडून तर विंबल्डनच्या अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभव पत्करावा लागल्याने यंदाच्या वर्षांत ग्रँडस्लॅमविना रहावे लागले आहे. त्यामुळे २१व्या ग्रँडस्लॅमसाठी त्याला पुढील वर्षी प्रयत्न करावा लागणार आहे. एटीपी क्रमवारी ः १. राफेल नदाल (स्पेन, ९९८५), २. नोवाक जोकोविच (सर्बिया, ९१४५), ३. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, ६५९०), ४. डॉमनिक थिम (ऑस्ट्रिया, ५८२५), ५. डानिल मेदवेदेव (रशिया, ५७०५), ६. स्टेफानोस त्सित्सिपास (ग्रीस, ५३००), ७. आलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी, ३३४५), ८. माटिओ बार्रेटिनी (इटली, २८७०), ९. रॉबर्टो बाटिस्टा (२५४०), १०. गाईल मोनफिल्स (फ्रान्स, २५३०).