नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी व्यक्ती असल्याचा आरोप करून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यानी काल राफेल जेट विमान खरेदी व्यवहारातील मोदी यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ३६ राफेल विमाने खरेदी व्यवहारातून मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या खिशात ३० हजार कोटी रुपयांची रक्कम घातली असा घणाघाती आरोपही गांधी यांनी केला. मात्र या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाही.
डसॉल्ट कंपनीने अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या या कंत्राटासाठी केलेल्या निवडीत आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केंद्र सरकारने आजपर्यंत केला आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण कालच फ्रान्स दौर्यावर रवाना झाल्या आहेत. या प्रकरणावर पांघरूण घालण्याच्या हेतूने त्यांचा हा तातडीने फ्रान्स दौरा असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली. एवढ्या अचानकपणे संरक्षणमंत्री फ्रान्सला रवाना होण्यासाठी एवढे मोठे काय घडले आहे? कोणती आणिबाणी कोसळली आहे? असे सवाल गांधी यांनी उपस्थित केले. राफेल विमान निर्मिती करणार्या डसॉल्ट एविएशन कंपनीला या व्यवहारात भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्स कंपनीची निवड करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा दावा गांधी यांनी केला.