राफेलचे महत्त्वाचे भाग टाटा भारतात बनवणार

0
2

राफेल लढाऊ विमानांसाठी लागणारे महत्त्वाचे भाग आता टाटा समूहाकडून भारतात तयार केले जाणार आहेत. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स ही राफेल लढाऊ विमानाच्या फ्यूजलेजचे उत्पादन करणार आहे. याकरिता दसॉल्ट एव्हिएशनबरोबर चार प्रॉडक्शन ट्रान्सफर करार केले असल्याची माहिती गुरुवारी कंपनीने दिली.
हे उत्पादन भारतीय तसेच जागतिक बाजारपेठांसाठी केले जाणार असून, त्यामुळे सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना मिळणार आहे. हे भारताच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमता मजबूत करणे आणि जागतिक पुरवठा साखळीला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल असणार आहे. या दोन कंपनीच्या भागीदारातून राफेलचे प्रमुख स्ट्रक्चरल सेक्शन भारतात तयार करण्याच्या उद्देशाने टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स एक अत्याधुनिक कारखाना हैदराबाद येथे उभारणार आहे. फ्यूजलेजचे मागीस शेल, राफेलचा मागचा संपूर्ण भाग, सेंट्रल फ्यूजलेज आणि पुढचा भाग यांचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या विमानांचे असे भाग पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर बनवले जाणार आहेत.