रानटी हल्ला

0
21

रशियातील दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकवार जग हादरले आहे. क्रेमलीनपासून अवघ्या वीस किलोमीटरवर आयसिसने मांडलेले हे मृत्यूचे तांडव थरकाप उडवणारे आहे. रशियन सरकार मृतांची संख्या कमी दाखवू पाहत असले, तरी अनधिकृत माहितीनुसार जवळजवळ दीडशे निरपराध नागरिकांचा त्यात बळी गेला आहे. मात्र, लक्षणीय बाब म्हणजे प्रत्यक्षात हा हल्ला चढवणाऱ्या चार दहशतवाद्यांसह एकूण अकरा जणांना जिवंत पकडण्यात रशियाच्या सुरक्षा यंत्रणांना यश आले. चार हल्लेखोरांच्या जबान्या नोंदवल्या जातानाचा व्हिडिओही रशियाच्या सरकारने जाहीर केला आहे. पैशासाठी आपण हा हल्ला चढवला आणि सूत्रधारांनी आपल्याला देऊ केलेल्या अर्धा दशलक्ष रूबेलपैकी अर्धे पैसेच आपल्याला मिळाले होते व त्यांनीच आपल्याला हल्ला चढवण्यासाठी शस्त्रे दिली होती, असे एक हल्लेखोर जबानीत सांगतो आहे. ह्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारल्याच्या बातम्या पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी दिल्या, परंतु रशिया हे मान्य करायला तयार दिसत नाही. हे हल्लेखोर युक्रेनमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते व ह्या हल्ल्याशी युक्रेन व त्याच्या पाठीशी असलेली अमेरिकाच असावी असे रशिया जगाला सुचवू इच्छित असल्याचे दिसून येते. युक्रेनने ह्या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी आयसिसऐवजी युक्रेनकडे बोटे दाखवून आपली राजकीय ईप्सिते साध्य करण्याचा धूर्त प्रयत्न रशियाने चालवला आहे. मात्र, ह्या हल्ल्यामागे आयसिस असावी हे मानण्यास बराच वाव आहे. मुख्य म्हणजे आयसिसने आजवर जगभरात चढवलेले दहशतवादी हल्ले आणि रशियाच्या क्रॉकस कॉन्सर्ट हॉलवरील हा हल्ला यामध्ये बरेच साम्य दिसते. लष्करी गणवेशात एका मिनीव्हॅनमधून आलेल्या ह्या हल्लेखोरांनी आत शिरून अंदाधुंद गोळीबार केला. नंतर आपल्याजवळील रसायन आसनांवर व पडद्यावर ओतून सभागृहाला आग लावून दिली. त्यामुळे हल्ल्यानंतर ह्या सभागृहाला आग लागली व त्याचे छतही कोसळले. जास्तीत जास्त प्राणहानी व्हावी ही हल्लेखोरांची रानटी मानसिकता ह्यामध्ये स्पष्ट दिसून येते आणि ती एका विशिष्ट वृत्तीकडेच अंगुलीनिर्देश करते. रशियावर आयसिसचा राग असणेही स्वाभाविक आहे, कारण इराक आणि सीरियामधील आयसिस खुरासानला शह देण्यासाठी रशियाही त्यामध्ये पुऱ्या ताकदीनिशी उतरला होता. 2015 साली आयसिस खुरासानचा खात्मा करण्यात रशियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. रशियावर दहशवाद्यांचे हल्ले काही नवे नाहीत. व्लादिमीर पुतीन यांनी रशियाची सत्तासूत्रे स्वीकारली तेव्हा चेचेन बंडखोरी जोरात होती. पुतीन यांनी तिला नंतर चिरडून टाकले हा भाग वेगळा. 2004 साली रशियातील एका शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळजवळ 186 मुलांसह तीनशे लोक ठार झाले होते. त्यानंतरच्या वीस वर्षांतला हा सर्वांत मोठा हल्ला म्हणावा लागेल. रशिया युक्रेनवर त्याचा ठपका ठेवू पाहत असले, तरी ह्या हल्ल्यामागे युक्रेन असता, तर त्याचे लक्ष्य एखादे लष्करी किंवा किमान सरकारी ठाणे असते. जाणूनबुजून निरपराध नागरिकांना लक्ष्य निश्चित केले गेले नसते. अमेरिकेच्या दूतावासाने अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्यताही व्यक्त केलेली होती. हल्ल्यामागे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा असत्या, तर त्याची पूर्वसूचना त्यांनी नक्कीच दिली नसती. त्यामुळे रशियाचे अकांडतांडव निरर्थक दिसते. त्याचा कोणताही पुरावा त्यांच्यापाशी नाही. एक गोष्ट हल्ल्यातून स्पष्ट झाली आहे ती म्हणजे रशियाही आता आयसिसपासून सुरक्षित राहिलेला नाही. आयसिसने यापूर्वी अफगाणिस्तानच्या राजधानीत काबूलमध्ये रशियाच्या दूतावासावर हल्ला चढवला होता. यावेळी थेट मॉस्कोत घुसून हल्ला चढवला गेला, तेही रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना. आणखी एक योगायोग नमूद करण्यासारखा आहे. ज्या आयसिस खुरासानच्या निःपातासाठी रशियाने आपली लष्करी ताकद लावली होती, त्या खुरासानच्या ताब्यातून सिरियातील बगौझ हा शेवटचा गाव हिसकावून घेतला गेला ती तारीख होती 23 मार्च 2019. म्हणजे त्या घटनेच्या पाचव्या स्मृतीदिनीच रशियावर हा हल्ला झालेला दिसतो. त्यामुळे ह्या हल्ल्यामागे आयसिस असावी ह्या संशयाला बळकटी मिळते. हल्ल्यामागील सूत्रधार पकडले गेले आहेत, त्यामुळे ह्या कटकारस्थानाचा पुरा पर्दाफाश करणे सोपे जाईल. त्यातून ह्या हल्ल्याच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचता आले पाहिजे, कारण हा केवळ रशियावर हल्ला नाही. समस्त आधुनिक जगावर झालेला हा हल्ला मानला गेला पाहिजे. कोणताही देश, कोणताही प्रदेश आयसिससारख्या प्रतिगामी रानटी शक्तींच्या निशाण्यावर असू शकतो. कोणत्याही परिस्थितीत ह्या नरराक्षसांना पुन्हा डोके वर काढण्याची संधी मिळता कामा नये.