रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय नाही

0
226

>> आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्यात कोविड महामारीचा फैलाव रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात कोविड महामारीच्या फैलाव रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी संचारबंदीबाबत वक्तव्य केल्याने राज्यातील हॉटेल व्यावसायिक, नववर्ष पार्टीचे आयोजक आणि पर्यटकांत खळबळ उडाली. तथापि, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी रात्रीच्या संचारबंदीबाबत स्पष्टीकरण केल्याने संचारबंदीबाबत चर्चा थांबली.

राज्यात कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी नवी दिल्ली, कर्नाटकच्या धर्तीवर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्याकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. संचारबंदीच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी एका ट्विट संदेशातून काल दिली.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहेे. गोवा हे प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने कोविड मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.
राज्यात रात्रीच्या वेळी पुन्हा संचारबंदी लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पर्यटक आणि नागरिकांनी कोविड मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे. पर्यटकांनी सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.