राज ठाकरेंना मुंबई पोलिसांची प्रतिबंधात्मक नोटीस

0
32

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात ४ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, त्यावर राज ठाकरे ठाम आहेत. राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे. राज ठाकरेंनी भोंगे उतरवण्यासंदर्भात बुधवारचा अल्टिमेटम दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना कलम १४९ अंतर्गत मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, ती मुदत संपत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल रात्री राज ठाकरेंनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली.

आम्हाला देशातील शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत; परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणे सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही. प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपापल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे, हे दाखवून द्यावे आणि मशिदीवरील भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी काल केले.